कल्याण स्थानक सॅटिस प्रकल्पास गती मिळण्यासाठी केडीएमसीत बैठकीचे आयोजन

0

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व प्राधिकरणांनी सहकार्य करण्याबाबत आयुक्तांचे आवाहन

कल्याण : कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत उपाययोजना करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकारी सह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या बैठकीस परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे तसेच कल्याण व डोंबिवली चे वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, परिवहन व्यवस्थापक विजयकुमार द्वासे, उपआयुक्त समिर भुमकर, संदिप तांबे, मराविम चे कार्यकारी अभियंता व अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे इतर अधिकारी तसेच आरटीओ‍, एमएसआरसीटीसी, वाहतूक इ. प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रथम कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरु असणारा सॅटीस प्रकल्प कार्यान्वित होणेकामी भेडसावणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. सुभाष चौक परिसरातील रस्ता रस्तारुंदीकरणात बाधित असलेल्या ऑप्टिकल इमारतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे, या ठिकाणचे आवश्यक क्षेत्र महापालिकेस प्राप्त झालेले नाही, परिणामी सुभाष चौकाकडील उड्डाणपूलाचे उताराचे कामास विलंब होत आहे. त्यामुळे कल्याण रेल्वेस्थानक कडील सुभाषचौककडे जाणाऱ्या वाहनांसाठी मुख्य रस्त्याकडील परळीकर मार्गापासून रामबाग रस्त्यावरून सुभाष चौक पर्यंत एक दिशा मार्ग केल्यास उड्डाण पुलाच्या उताराच्या रिटेनिंग वॉलचे काम सुरू होऊ शकते , त्यामुळे अशाप्रकारे वाहतूक नियंत्रण करणेबाबत प्रस्ताव या बैठकीत वाहतूक विभागासमोर मांडला असता त्यावर चर्चा होवून दि.०५ नोव्हेंबर पर्यंत वाहतुक विभागामार्फत अधिसूचना निर्गमित करुन दि.१० नोव्हेंबर पर्यंत उड्डाण पुलाच्या रिटेनिंग वरच्या कामास सुरुवात करावी, अशा सुचना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिल्या.

सॅटीस प्रकल्प अंतर्गत एमएसआरटीसीच्या इमारतीचे काम सुरु आहे. या एमएसआरटीसीच्या बसेसची वाहतूक अद्यापही कल्याण बस स्थानकातून होत असल्याने बस स्थानकाचे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे ,त्यामुळे येथील बस वाहतूक दुर्गाडी येथून करणेबाबत वारंवार सुचना देवून देखील, अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नाही . त्यामुळे ५ नोव्हेंबर पासून लांब पल्ल्याच्या तसेच मुरबाड,पनवेल,भिवंडी येथे जाणाऱ्या सर्व बसेस दुर्गाडी येथून मार्गस्थ होतील असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. यासाठी दुर्गाडी येथे विशेष प्रकल्प विभागामार्फत व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे.

वालधुनी ब्रिजची दुरुस्ती लवकरात लवकर पुर्ण करणेबाबतही महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत सुचना दिल्या. कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता, तेथे मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या रिक्षांचे नियोजन करणेबाबतच्या सुचना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी उ‍पस्थित आरटीओ आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानक बाहेरील १५० मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी वाहतुक पोलीस , आरटीओ, महापालिका प्रभागांचे सहा.आयुक्त यांनी दररोज संयुक्तिक कडक कारवाई करावी, अशाही सुचना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत दिल्या.

वाहतुकीस अडथळा ठरणारे महावितरणचे खांब संबंधित प्राधिकरणाने त्वरित काढण्याची कारवाई करावी अशा सूचना परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत दिल्या. नागरिकांचा रस्त्यावरील प्रवास विनासायास व्हावा यासाठी वाहतूक कोंडी दूर होण्याच्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत केले आणि त्यास उपस्थित अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech