कल्याण पश्चिमेत रखडलेल्या विविध पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासोबत मॅरेथॉन बैठका

0

अनेक वर्षांपासून ठप्प पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची चिन्हे

कल्याण :  कल्याण पश्चिमेत गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विविध पुनर्विकास प्रकल्पांतील शेकडो रहिवाशांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. शनिवारी यासंदर्भात झालेल्या वेगवेगळ्या मॅरेथॉन बैठकांमध्ये नरेंद्र पवार यांनी या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करणाऱ्या या शेकडो रहिवाशांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.

त्यानंतर प्रकल्प रखडलेल्या इतर रहिवाशांनी साधला संपर्क…
तत्पूर्वी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेच्या चिकणघर येथील १४ वर्षांपासून रखडलेल्या म्हाडा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात बैठक झाली. त्यामुळे इथल्या साडेचारशे कुटुंबियांना या प्रकरणात एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्याबाबतची माहिती कल्याणातील इतर पुनर्विकास प्रकल्प रखडलेल्या रहिवाशांना प्रसिद्धीमाध्यमांच्या माध्यमातून मिळाली. अशा अनेक रहिवाशांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांना संपर्क साधून आम्हालाही या अडचणीतून बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानुसार या रहिवाशांसोबत झालेल्या बैठकांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या सर्व रहिवाशांना शासकीय स्तरावर, कायदेशीर स्तरावर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वस्त केले.

प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत तुमच्यासोबतच…
काल दिवसभरात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिमेतील श्री कॉम्प्लेक्स, रवी उदय सोसायटी, पटेल ग्रुप, म्हाडा एमआयजी प्रकल्प अशा रखडलेल्या विविध पुनर्विकास प्रकल्पातील शेकडो रहिवाशांची वेगवेगळी बैठक घेतली. पटेल ग्रुपमध्ये बँकांकडून लोन घेऊन बुकिंग केलेल्या आणि गेल्या १४ वर्षांपासून त्यांचे हफ्ते भरत असलेले २५० हून अधिक जण आणि टायकून ग्रुपमध्ये फसवणूक झालेले ४०० पेक्षा जास्त नागरिकांच्याही नरेंद्र पवार यांच्यासोबत बैठका झाल्या. ज्यामध्ये या सर्व रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीमुळे होत असलेल्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रासाची माहिती देत त्यातून बाहेर काढण्याची कळकळीची विनंती पवार यांना केली. तसेच राज्यामध्ये आता तुमचेच सरकार असून त्याच्या माध्यमातून आम्हाला आता तरी न्याय मिळवून देण्याची मागणीही यावेळी रहिवाशांनी केली. त्यावर तुमचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण 100 टक्के तुमच्यासोबतच असल्याचे पवार यांनी यावेळी या रहिवाशांना सांगितले.

दबावाला अजिबात न जुमानता संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी…
दरम्यान माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याप्रकरणी बैठक घेण्यासह अर्धवट स्थितीत असलेल्या एका प्रकल्पाच्या कामाची पाहणीही केली. ही पाहणी करण्यापासून नरेंद्र पवार यांना रोखण्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांना पत्रही दिले असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु पवार यांनी या दबावाला अजिबात न जुमानता संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करत मग रहिवाशांचीही बैठक घेतली.

आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करण्याचा इशारा…
तर राज्य सरकारने आम्हाला न्याय मिळवून दिला नाही तर आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान करण्याचा इशारा या शेकडो रहिवाशांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात या शेकडो रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. मात्र त्यानंतरही आजतागायत हे शेकडो रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी तर राज्य सरकारकडून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कार्यवाही होते की नाही हे पहावे लागेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech