केडीएमसी अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये घुसून मारण्याचा खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

0

समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल
विविध विषयांसाठी खासदारांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट


कल्याण : आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध प्रलंबित कामांबाबत खासदार सुरेश म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. यावेळेला नागरिकांच्या तक्रारी असतांना देखील नगर रचनाकार अधिकारी सुरेंद्र टेंगळे हे उपस्थित राहिले नसल्याने आधीच खासदार म्हात्रे आयुक्तांसमोर संतापले. आयुक्तांच्या भेटीनंतर महानगरपालिकेच्या आवारात अन्य नागरिकांच्या पुन्हा तक्रारी आल्यानंतर खासदारांनी चक्क अधिकाऱ्यांना मारणार असल्याची धमकी दिली. एक तक्रार अजून आली तर टेंगळेला मारणार, त्याला काळ कशाला फासायचं असा संताप खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नगररचना विभागाचे अधिकारी सुरेंद्र टेंगळे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे चांगलेच संतापले आहेत. संतप्त खासदारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांना मारण्याची भाषा वापरली. सामान्य नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने खासदार म्हात्रे यांनी आयुक्तांकडे दाद मागितली आहे, तसेच लेखी तक्रार आल्यास त्याला ‘सरळ’ करण्याची धमकी दिली आहे.

कल्याण परिसरातील नागरिकांच्या सोयी-सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि पायाभूत सुविधा विषयक मुद्द्यांवर आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा झाली. या कामांना लवकर गती मिळावी यासाठी आवश्यक त्या विनंत्या देखील करण्यात आल्या. यावेळी आयुक्तांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कल्याण पश्चिम स्टेशन परिसराचा विकास ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत सुरू आहे. या विकासकामांमध्ये स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा रस्ते विस्तारीकरणामुळे बाधित झाली आहे. बाधित झालेल्या जागेच्या बदल्यात पालिकेने दिलेली १७ गुंठे जागा अपुरी आहे, असे खासदारांचे म्हणणे आहे. या अपुऱ्या जागेत स्मारक, ग्रंथालय आणि अभ्यासिका विकसित करणे शक्य नाही. त्यासाठी किमान ३७ गुंठे जागा आवश्यक आहे. याकरिता जागेचे सीमांकन करणे आवश्यक असून, त्याचा प्रस्ताव लवकरच आयुक्तांकडे दिला जाणार असल्याचे खासदार म्हात्रे यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech