मुंबईतील १३८५ रस्‍त्‍यांचे ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण

0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्‍त्‍यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ६१४ रस्त्यांवर चौक ते चौक (Junction to Junction) अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत (Half Width) याप्रमाणे मिळून एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्‍ते वाहतुकीस खुले करण्‍यात आले आहेत. निर्धारित कालमर्यादेत, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करुन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुरक्षित व सुयोग्य स्वरूप देण्याच्या दृष्टिने रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील प्रमुख आणि दुय्यम मार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत, वेगवान व शिस्तबद्ध होण्यास मदत होणार असून, त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात लक्षणीय सुधारणा होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक नियोजन करुन सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. त्‍यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होणार आहे. काँक्रिट रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परिरक्षणाचा खर्च देखील कमी होणार आहे. तसेच, काँक्रिट रस्ते दीर्घकाळ टिकतात. सबब, मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार आहे. त्‍याचे दूरगामी सकारात्‍मक परिणाम दिसून येणार आहेत.

महत्त्वाकांक्षी अशा रस्‍ते काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत टप्पा एक आणि टप्पा दोनमध्ये एकूण मिळून २,१२१ रस्ते कामांचे नियोजन करण्यात आले, ज्‍यामध्‍ये ६९८.४४ किलोमीटर लांबीच्‍या रस्‍त्‍यांचा समावेश आहे. पैकी, दिनांक ३१ मे २०२५ अखेर ठरलेल्या मुदतीत १,३८५ रस्त्यांची मिळून ३४२.७४ किलोमीटरची कामे पूर्ण करण्‍यात आली आहेत. म्हणजेच पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे. एकूण १८६ किलोमीटर लांबीचे ७७१ रस्‍ते एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत (End to End) पूर्ण झाले आहेत. तर, १५६.७४ किलोमीटर लांबीच्‍या ६१४ रस्‍त्‍यांचे काम चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत पूर्ण झाले आहे.

टप्‍पा १ अंतर्गत ३२०.०८ किलोमीटर लांबीच्‍या ७०० रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण काम हाती घेण्‍यात आले. पैकी १०१.६७ किलोमीटर लांबीचे ३४३ रस्‍त्‍यांचे एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत (End to End) काम पूर्ण झाले आहे. तर, चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत २३९ रस्‍त्‍यांचे मिळून १०१ .६८ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. एकूण ७०० पैकी ५८२ रस्‍त्‍यांचे काम पूर्ण झाले असून त्यांची एकूण मिळून २०३.३६ किलोमीटर आहे. या निश्चित केलेल्‍या उद्दिष्‍टापैकी ६३.५३ टक्‍के लक्ष्‍यपूर्ती करण्‍यात आली आहे.

टप्‍पा २ अंतर्गत ३७८.३६ किलोमीटर लांबीच्‍या १४२१ रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण काम हाती घेण्‍यात आले. पैकी ८०३ रस्‍त्‍यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये ८४.३३ किलोमीटर लांबीच्‍या ४२८ रस्‍त्‍यांचे काम एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत (End to End) पूर्ण झाले आहे. तर, ५५.०६ किलोमीटर लांब अंतर होईल, अशा एकूण ३७५ रस्‍त्‍यांचे काम चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदीपर्यंत पूर्ण झाले आहे. दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत एकूण १३९.३८ किलोमीटर लांबीच्‍या ८०३ रस्‍त्‍यांची कामे पूर्ण झाली आहेत. निश्चित केलेल्‍या उद्दिष्‍टापैकी ३६.८४ टक्‍के लक्ष्‍यपूर्ती करण्‍यात आली आहे.

रस्‍ते काँक्रिटीकरण प्रकल्‍प अंतर्गत काँक्रिट ओतण्याची (PQC) कामे दिनांक २३ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. ‘पीक्यूसी’ची कामे पूर्ण झाल्यानंतर थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी कामे देखील पूर्ण करण्‍यात आली आहेत. बहुतांशी रस्ते ‘एण्ड टू एण्ड’ तर काही रस्ते ‘जंक्शन टू जंक्शन’ पूर्ण झाले आहेत. चौक ते चौक अथवा अर्ध्या रुंदी पर्यंत काँक्रिटीकरण कामे झाल्‍यावर रस्‍त्‍याचा उर्वरित भाग मास्टिक अस्फाल्टद्वारे पूर्ण करण्यात आला आहे. उर्वरित कामे पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत.

रस्‍ते काँक्रिटीकरण कामे दर्जेदार आणि अत्‍युच्‍च गुणवत्ता राखून करण्‍यात आली आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) यांची गुणवत्‍ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (Third Party) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्‍या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्‍यात सामंजस्‍य करार (MoU) करण्‍यात आला आहे. काँक्रिट मिश्रण प्रकल्पात मिश्रण बनविण्‍याच्‍या टप्‍प्‍यापासून ते काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंतच्‍या विविध चाचण्‍या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यात क्‍यूब टेस्‍ट, कोअर टेस्‍ट, ड्युरॅबिलीटी टेस्‍ट, फिल्‍ड डेन्सिटी टेस्‍ट आदी विविध तांत्रिक चाचण्यांचा समावेश आहे.

आकस्मिक भेटी (surprise visit), कार्यस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देणे, त्‍याबाबतची निरीक्षणे नोंदविणे, भेटीच्‍या दरम्‍यानची निरीक्षणे आणि त्‍यावरील सल्‍ला यांबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या तज्‍ज्ञांनी वेळोवेळी रस्‍ते विभागातील अधिका-यांना मार्गदर्शन केले आहे. महानगरपालिकेच्‍या पुढाकाराने भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या पवईस्थित सभागृहात दोनवेळा विचारमंथन (ब्रेन स्‍टॉर्मिंग) कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली. ज्‍यामध्‍ये आयआयटी चमूने नोंदविलेली निरीक्षणे, महानगरपालिका अभियंत्‍यांना कार्यस्‍थळी आलेले अनुभव, प्रत्‍यक्ष कामकाजातील आव्‍हाने यावर विचारविनिमय करत महानगरपालिका अभियंत्‍यांच्‍या शंकांचे निरसन देखील करण्‍यात आले.

रस्ते कामे पूर्ण करताना महानगरपालिकेचा जल अभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मलनिःसारण प्रकल्प आदी विविध विभाग आणि उपयोगिता सेवा वाहिन्यांशी संबंधित यंत्रणा जसे की, विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांच्‍यासमवेत समन्वय ठेवण्‍यात आला आहे. काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्‍या रस्‍त्‍यांवर कोणत्‍याही संस्‍थेस खोदकाम, चर करायला मनाई करण्‍यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेतर्फे खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

सद्यस्थितीत रस्ते कामाचा राडारोडा, बांधकाम साहित्य, रस्तारोधक (Barricades) हटविण्‍यात आले असून रस्ते संपूर्णत: वाहतुकीस खुले करण्‍यात आले आहेत. रस्‍त्‍यालगतच्‍या पर्जन्य जलवाहिन्या देखील स्वच्छ करण्यात आल्या आहेत. विभाग कार्यालयांकडून रस्त्यांवरील अधिकृत गतिरोधकांची यादी प्राप्त झाल्‍यानंतर गतिरोधकांची पुनर्बांधणी (Restore) करण्‍यात येणार आहे.

ठळक मुद्दे
– महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍याकडून सातत्‍याने आढावा बैठकांचे आयोजन, प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळास भेटी देऊन कामांची पाहणी
– अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍यासह वरिष्ठ अधिकारी व अभियंत्यांकडून रस्ते कामांना वेळोवळी भेट देवून आकस्मिक पाहणी
– विशेषतः कामे सुरु असताना रात्रीच्यावेळी भेटी
– महानगरपालिकेने निश्चित केलेल्‍या मानक कार्यपद्धती (एस.ओ.पी.) नुसार रेडीमिक्स काँक्रिट प्लांट (आर.एम. सी.) चे कामकाज सुरू आहे का, याची देखील पाहणी
– काँक्रिट वाहून नेणाऱया ट्रान्झिस्ट मिक्‍सर वाहनांवर वाहनांचे थेट स्थान आणि हालचाल यांचा मागोवा घेणारी तंत्रज्ञान प्रणाली अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित
– काँक्रिट बनविण्यापासून ते काँक्रिट टाकण्यापर्यंत आणि क्युरिंग प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या म्हणजेच सुरवातीपासून ते शेवटपर्यंतच्या (एन्ड टू एन्ड) सर्व कार्यवाहीवर महानगरपालिका अभियंत्यांचे नियंत्रण
– काँक्रिटीकरण कार्यस्थळी नागरिकांसाठी माहिती फलक प्रदर्शित; त्याच बरोबर ‘क्यू आर कोड’ स्कॅन करण्याची सुविधा देखील उपलब्ध
– पदपथ सर्वसामान्य पादचाऱयांसोबतच दिव्यांग व्यक्तींसाठीही सुगम्य आणि दिव्यांगस्नेही करणार
– रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांभोवती संरक्षक आळे तयार करून त्यामध्ये सुपीक माती टाकण्यात आली, जेणेकरून झाडांचे संगोपन आणि वृद्धी अधिक प्रभावीपणे होऊ शकेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech