वसई : नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील १३-१४ वर्षे जुन्या साई सिमरन अपार्टमेंटमधील ४०४ सदनिकेचा स्लॅब कोसळला. या चार मजली इमारतीत एकूण २२ सदनिका आणि ३ गाळे आहेत. याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमनदलाला मिळताच सदनिकेत अडकलेल्या १४ वर्षीय मुलगा आणि ४७ वर्षीय महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
या घटनेनंतर वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीतील २२ खोल्या रिकाम्या करून तिथल्या रहिवाशांना जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते स्थलांतर केले आहे. ही घटना घडल्यामुळे वसई-विरार शहरातील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर घडलेल्या घटनेमुळे नागरिकांनी वसई-विरार महापालिकेवर शहरातील धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. पावसाळा जवळ येत असतानाही महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी तयार करून योग्य ती उपाययोजना करण्यात उशीर केल्याचे सांगितले जात आहे.