नारळी पौर्णिमा : सागर संर्वधनाचा संदेश देणारा उत्सव

0

नारळी पौर्णिमेच्या सणाची लगबग कोळीवाड्यांमध्ये सुरु झाली आहे.  मासेमारीच्या नव्या हंगामात दर्यासागरात जाण्यासाठी मासेमारी नौका डागडूजी रंग रंगोटिकरुन मासेमारी करिता सज्ज असून कोळीवाड्यात उत्साहाचे वातावरण आहे . सागर देवतेला नारळ अर्पण करुन सागरसंपन्नतेचे संर्वधन करण्याचा संकल्प करुन कोळी समाज आपल्या नौका पाण्यात उतरविणार आहे.

श्रावण महिना हा सणोत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात साजरे केले जाणारे सण आणि त्यायोगे पाळली जाणारी व्रत वैकल्ये, पुजा पठण या मागे मानवी जिवन आणि निर्सग यांचा मेळ राखण्याचा आशय दिसून येतो.

किनारपट्टिवर वास्तव्य करणारा आणि सागराशी मेळ असलेला कोळी समाज श्रावणातील हि पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करते. मासेमारी या आपल्या पारंपारिक व्यवसायाला सुरवात करतांना दर्यासागराला श्रीफळ अर्पुन यथावत पुजा करुन नव्या मोसमारी मोसमाचा शुभारंभ कोळी समाज करत असतो.

दर्यासागराला दैवत मानणारया कोळी समाजात या श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी उत्साहाचे वातावरण असते.

“नारली पुनवेचे पारु दर्याचे सनाला,
नेस नवा सारा, चल जाउ आपुले बंदरा”

“सन अयलाय गो अयलाय गो ,नारली पुनवेचा,
मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनयेला”

या आणि अश्या स्वरचित गितांवर कोळीवाडे , सजून धजून , नाचत गात दर्याची पुजा करतात . नारळीभात, नारळाच्या करंजा ,नारळी पाक असे नारळा पासून बनविलेले पदार्थ कोळीवाड्यात घराघरात बनविले जातात. पारंपारिक वेषात बॅंडच्या तालावर मिरवणूकीने सोन्याचा नारळ दर्या सागराला अर्पण केला जातो . हे उत्सव म्हणजे सामाजिक एकता आणि व्यवसायावरील निष्ठेची उस्फुर्त अभिव्यक्ती असते.

सणोत्सवांच्या उगमाचा वेध घेतल्यास यामागे निसर्ग आणि मानवी जिवन यांचा मेळ घालण्याचा उद्देश दिसून येतो. प्रजनानाकरिता सुरक्षित असलेल्या खाडी किनारयावरिल कांदळवने, खारफुटी या मध्ये समुद्रातील मासे आश्रय घेतात या वेळी मासेमारी करु नये असा परंपरेने घालून दिलेला प्रघात कोळी समाज व्रत म्हणून पाळतो व प्रजनन काळात मासेमारी पुर्ण पणे बंद ठेवतो .व हा कालावधी पुर्ण झाल्यावरच मासेमारी साठी बाहेर पडतो .

हि परंपरा निर्माण होण्यामागे निसर्ग संर्वधनाचा उद्देश पुर्वसुरिंचा होता. उत्सवाच्या माध्यमातून तो जपलाही जात आहे . सागराला देवस्थानी मानले तर त्याच्या साधन संपन्नतेचे सर्वधनही झाले पाहिजे हि दिक्षा नारळी पौर्णिमेच्या उत्सवातून कोळी समाजाला मिळालेली आहे आणि ति, तो भक्तीभावाने पाळतही आहे .

आज प्रदूषणाचा विळखा विस्तिर्ण अश्या सागराला पडलेला आहे. त्याचे विपरित परिणाम नागरी जिवनावर दिसत आहेत. मुंबई आणि ठाणे किनारपट्टिवर झालेले सागरी प्रदूषण , कांदळवने आणि खारफुटिवर झालेले अतिक्रमण या महानगराला व येथिल नागरी जिवनाला धोकादायक ठरत आहे . आणि म्हणूनच सागरसंपन्नतेचे सर्वधन होणे आवश्यक आहे.  या करिता सागरी संर्वधनाची दिक्षा देणारया या “नारळी पौर्णिमेच्या” सणाच्या साजरीकरणात कोळी समाजासह मुंबई ठाण्यातील नागरिकांनी देखिल सहभागी व्हावे असे आवाहन आहे .


आनंद प्रभाकर कोळी
अध्यक्ष , ठाणे जिल्हा कोळी समाज
अखिल भारतीय कोळी समाज (नवी दिल्ली) महाराष्ट्र शाखा

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech