मुंबई : मनसेने मोर्चासाठी मीरा भाईंदर हाच मार्ग निवडला, त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन शहरातील वातावरण तापलं आहे.मनसेच्या मोर्चाची परवानगी पोलिसांनी का नाकारली, याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी पोलिसांकडे यासंदर्भात विचारणा केली की मनसेच्या मोर्चाला परवानगी का दिली नाही. मोर्चाच्या मार्गाबाबत चर्चा सुरू होती, असं सांगण्यात आलं. त्या मार्गावरून मोर्चा झाला असता तर संघर्ष झाला असता. पोलिसांनी मार्ग बदलावा असं म्हटलं होतं,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
“कुणालाही मोर्चा काढायचा असेल तर परवानगी मिळेल पण आम्हाला असाच मोर्चा काढायचा आहे तसाच काढायचा आहे असं चालणार नाही,” असं मुख्यमंत्र्यांनी मोर्चाला नकार देण्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करताना सांगितलं. “ते काल म्हणाले की आम्हाला सभा घ्यायची आहे. ती परवानगी देखील त्यांना दिली होती,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “मोर्चा काढायला कुणालाही ना नाहीये. पण पोलिसांनी त्यांना सातत्याने सांगितलं होतं की तुम्ही मार्ग बदला,” असं फडणवीस म्हणाले. मीरा-भाईंदरमधील वातावरण मनसेच्या मोर्चामुळे चांगलेच तापलेले असताना आता व्यापाऱ्यांनी ३ जुलैच्या मोर्चासंदर्भात माफी मागितली आहे. तसं पत्रच त्यांनी पोलीस उपायुक्तांना पाठवलं आहे.
पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना व्यापाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राचा विषय ‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबाबत’ असा आहे. आमच्या व्यापारी संघाकडून ३ जुलै २०२५ रोजी जमा झालेल्या व्यक्तीकडून कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी आमच्या व्यापारी संघाच्या वतीने आम्ही क्षमा याचना करतो. आमचे उद्दीष्ट फक्त आणि फक्त व्यापारी संघामधील भीतीचे वातावरण दूर करणे व पुन्हा आमच्यावर अशाप्रकारे हल्ले होऊ नये या करिता होता, असं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनसेकडून आज मीरा भाईंदर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चाला परवानगी नसली तरी आज मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळेच पहाटे साडेतीन वाजता मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यापाठोपाठ मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटील यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या. पोलिसांनी अनेक ठिकाणी मनसैनिकांची अडवणूक केली आहे. अनेकांना ताब्यात घेतले आहे. मोर्चाच्या मार्गावर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.