माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यालयात झाले सार्वजनिक प्रक्षेपण
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन, सोशल मीडियावरील तरुणांचे योगदान आणि आदिवासी वीरांच्या पराक्रमांचा उल्लेख करत देशवासीयांशी संवाद साधला. कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने जनसंपर्क कार्यालयात आयोजित सार्वजनिक प्रक्षेपणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी बचत उत्सव, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तू आणि आत्मनिर्भर भारत याबाबत देशवासीयांना संबोधित केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “संस्कृत म्हटले की आपल्या मनात वेद, उपनिषद, पुराणे, धर्मग्रंथ आणि अध्यात्म येते. पण या सर्वांसोबतच संस्कृत एकेकाळी संवादाची, शिक्षणाची आणि संशोधनाची भाषा होती. गुलामगिरीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही संस्कृतकडे दुर्लक्ष झाले, मात्र आता काळ बदलत असून संस्कृत नव्या जोमाने पुढे येत आहे.”
तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक तरुण संस्कृतला नवसंजीवनी देत आहेत. त्यांनी काही उदाहरणे देत यश साळुंके या तरुणाचा उल्लेख केला, जो संस्कृतमध्ये क्रिकेटवरील मनोरंजक व्हिडिओ तयार करतो. कमला आणि जान्हवी या दोन बहिणी अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संगीतावर संस्कृतमध्ये कंटेंट तयार करतात. तसेच ‘संस्कृत छात्रोऽहम्’, ‘समष्टी’ आणि भावेश भीमनाथानी यांसारखे तरुणही संस्कृतमधून विविध विषयांवर माहिती देत आहेत. तर “भाषा ही कोणत्याही संस्कृतीची वाहक असते. हजारो वर्षांपासून संस्कृतने ही भूमिका निभावली आहे आणि आजची तरुण पिढी ती जबाबदारी निभावत आहे,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
तसेच देशाचे राष्ट्रगीत असलेले ‘वंदे मातरम्’ या गीताला यंदा ७ नोव्हेंबर रोजी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. हे केवळ एक गीत नाही, तर ते एक ऊर्जास्रोत आहे ज्याने कोट्यवधी भारतीयांना देशभक्तीच्या भावनेने प्रेरित केले आहे. आजही हे गीत आपल्याला राष्ट्रसेवेची आणि मातृभूमीप्रती निष्ठेची जाणीव करून देत आहे. त्यामुळे या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. हॅशटॅगवंदे मातरम् १५० या नावाने देशातील जनतेने आपल्याला यासंदर्भातील सूचना पाठवण्यासह त्यांनी यावेळी सांगितले. तर सणासुदीच्या काळात बाजारात स्वदेशी वस्तूंच्या खरेदीत मोठी वाढ झाली असून ही सुखद गोष्ट असल्याची भावनाही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
यासोबतच पंतप्रधानांनी या मन की बातमध्ये इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व — कोमाराम भीम — यांचा आणि त्यांच्या पराक्रमाचाही उल्लेख केला. “हैदराबाद संस्थानातील निजामच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्याचे उदाहरण देत त्यांनी पुढे सांगितले की, “कोमाराम भीम यांनी फक्त ४० वर्षांचे आयुष्य जगले, परंतु त्यांच्या पराक्रमाने आदिवासी समाजात आत्मसन्मान आणि संघर्षाची भावना जागवली. १९४० मध्ये निजामाच्या सैनिकांनी त्यांची हत्या केली, पण ते आजही आदिवासी समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
तर १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव दिवसाचा उल्लेख करत मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण केली. “बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्य संग्रामात आणि आदिवासी हक्कांच्या रक्षणासाठी केलेले कार्य अद्वितीय आहे. मला त्यांच्या उलीहाटू या गावाला भेट देण्याचे सौभाग्य लाभले, तेथील भूमीची माती मी कपाळी लावली,” असे त्यांनी सांगितले.
कल्याण पश्चिमेतही वंदे मातरम् चा उत्सव साजरा करणार – माजी आमदार नरेंद्र पवार
भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम् ला यंदा १५० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिममध्ये वंदे मातरम् उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे. तसेच कल्याणातील प्रत्येक नागरिकानेही आपापल्या स्तरावर या राष्ट्रगीताला अभिवादन करण्याचे आवाहनही नरेंद्र पवार यांनी यावेळी उपस्थितांना केले.