डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीची पोलिसांकडे मागणी
कल्याण : लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादातून कल्याण पूर्वेतील अर्णव खैरे या १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटत असून अर्णवच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या लोकांना शिक्षा देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीने केली आहे. याबाबत समितीच्या वतीने कल्याण लोहमार्ग पोलिसांना निवेदन दिले आहे. कल्याण पुर्वेतील सहजीवन वसाहतीत राहणारा १९ वर्षीय अर्णव खैरे या विद्यार्थ्याला १८ नोव्हेंबर रोजी ट्रेनमध्ये काही अज्ञात मुलांच्या टोळक्याने मराठी वोलण्याच्या वादातुन विनाकारण मारहाण केली. त्यामुळे मानसिक तणावात जाऊन अर्णव खैरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. या आत्महत्येस जवाबदार असलेल्या अज्ञात मुलांच्या टोळक्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीने केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष हरिभाऊ भालेराव, सचिव विजय पवार, खजिनदार मंगेश इंगळे, केतन रोकडे, संजय तेलुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.