राज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’

0

मुंबई : आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये १६ जून २०२५ या दिवशी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात “शाळा प्रवेशोत्सव” या कार्यक्रमाद्वारे उत्साहात होणार आहे. या दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. प्रवेशाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी केवळ औपचारिक न राहता आनंद, आत्मीयता आणि प्रेरणा देणारा क्षण ठरावा, हा त्यामागील मुख्य हेतू असल्याचे सांगून आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागामार्फत विविध बहुआयामी उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मंत्री डॉ. वुईके म्हणाले, राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आणि ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. नाशिक व ठाणे विभागातील शाळा दि. १६ जून २०२५ पासून सुरू होणार आहेत. तर नागपूर व अमरावती विभागातील शाळा दि. ३० जून २०२५ पासून सुरु होतील. मुंडेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत १६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवासाठी मी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक शाळेसाठी एक परिचारिका नियुक्त विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत एक परिचारिका (नर्स) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित देखरेख शक्य होणार आहे. आश्रमशाळांमध्ये इयत्ता १ लीपासून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने, ६ वर्षांवरील वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शाळेत नर्सची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे. आरोग्यविषयक तक्रारी उद्भवल्यास विद्यार्थ्यांना तत्काळ प्राथमिक उपचार देता येणार आहेत. परिचारिकांमार्फत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला, प्रथमोपचार देण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यासही मदत होईल. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करणारा ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech