मुंबई : सद्गुरु श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी नुकतीच ८ जुलै रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. याचे औचित्य साधून जीवनविद्या मिशनने श्री प्रल्हाद पै यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुग्धशर्करा योग म्हणजे हा सोहळा १० जुलै गुरु पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबईसह महाराष्ट्रातून आणि परदेशातून नामधारक उपस्थित होते. तब्बल २० हजाराहून अधिक लोकांची नोंदणी झाली होती तर लाखो लोकांनी ऑनलाईन हा कार्यक्रम पाहिला.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाने झाली. यानंतर कार्यक्रमात गुरुपूजन झाले. त्यानंतर संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून सद्गुरुंच्या चरणी संगीत पुष्प अर्पण करण्यात आलं. सोहळ्यात दोन महत्त्वाच्या आणि अधोरेखित करणाऱ्या गोष्टी ठरल्या त्या म्हणजे श्री सद्गुरु वामनराव पै यांच्या ‘एकमेव – जनमनाचा असामान्य शिल्पकार’ या सद्गुरु चरित्राच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. या सद्गुरु चरित्राचे मुखपृष्ठ पद्मश्री पुरस्कृत सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव यांनी रेखाटले आहे.
श्री अच्युत पालव यांनी या सद्गुरु चरित्राच्या मुखपृष्ठाच्या अनावरणानंतर आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘पेरुचाळ ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा हा प्रवास श्री सद्गुरु वामनराव पै यांचा खूप मोठा वाटा आहे’. सद्गुरुंनी दिलेला ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा दिव्य संदेश मी माझ्या जीवनात तंतोतंत पाळला.
त्यानंतर श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्यावर एक पुस्तक लिहिण्यात आलं आहे. ‘कृतज्ञ तू कृतार्थ तू’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. श्री प्रल्हाद वामनराव पै कायम कृतज्ञतेचे महत्त्व पटवून देतात. प्रल्हाद पै म्हणतात की, “कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात”. या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री प्रल्हाद पै यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त वाळू शिल्पाच्या (सँड आर्ट) माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. नितेश भारती या कलाकाराने आपल्या कलाकृतीतून प्रत्येक नामधारकाच्या भावना टिपल्या आहेत. या कलाकृतीतून प्रल्हाद दादांचा आतापर्यंतचा प्रवास मांडला आहे.
या कार्यक्रमात श्री प्रल्हाद दादा यांचे औक्षण करुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पद्मश्री अच्युत पालव, डॉ. प्रसाद प्रधान, निलेश जाधव, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार गोपाळ शेट्टी, विजय बाविस्कर भाई गिरकर, सनदी अधिकारी वंदना मोहिते, अंकित काणे, सुरेश हावरे, अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अभिनेते अविनाश नारकर, अशोक हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.