एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे पालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण

0

ठाणे : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहिती आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केले. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनिकृत आसनव्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभिकरण उपक्रमाचे भूमिपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आले. त्यानंतर, त्यांनी शेठ लखमिचंद फतेचंद प्रसूतीगुहाचे लोकार्पण केले. तसेच, तिथे जनतेशी संवाद साधला.

खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतिगृह तयार झाले आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिकेने आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असेही त्यांनी निर्देश दिले. आतकोली येथे क्षेपणभूमीवर उद्यान फुलते आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत २ लाख झाडे लावली जाणार आहेत. तसेच, सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करीत आहे. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागले आहे. तत्पूर्वी, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. एकुण १० नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर आजपासून सुरू होत आहेत. फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होत आहे. नाल्यांची कामे सुरू झाली असल्याचेही त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, शुभारंभ आणि भूमिपूजन केले. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक मालती पाटील, रमाकांत पाटील, भरत चव्हाण, पूजा वाघ, सुधीर कोकाटे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ठाणे जिल्हा शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मीनल पालांडे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि राजेश सोनवणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, डॉ. वर्षा ससाणे, डॉ. राणी शिंदे, वृक्ष अधीक्षक केदार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

धर्मवीर आनंद दिघे यांचे देखणे स्मारक होणार
छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे टॉवरची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तेथे आनंद दिघे यांचा पूर्णाकृती पुतळाही आहे, हे त्यांचे अतिशय देखणे स्मारक होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराने येथे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षण देता येणार आहे. येथून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सध्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये पाच बॅडमिंटन कोर्ट असून, नवीन विस्तारीकरणाच्या नियोजित इमारतीत आणखी पाच कोर्ट, तसेच मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह (हॉस्टेल), व्यायामशाळा व इतर सर्व आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नवीन इमारतीचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार असून, येथे सराव करणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत प्रगती करण्यासाठी सर्व प्रकारची मदत पुरवली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले. या प्रसंगी ठाण्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा प्रात्यक्षिक सामना (प्रदर्शनीय सामना) देखील खेळविण्यात आला. श्री छत्रपती पुरस्कार विजेते दीप रांभीया आणि क्रिश देसाई या बॅडमिंटनपटूंचा खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech