ठाणे : रेमंड संकुलात प्रथमच युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांनी आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात खोपटचा राजा मित्र मंडळाने सहजपणे शिस्तबद्ध पद्धतीत ९ थर रचून ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळविले. पावसाच्या रिमझिम सरींमध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीत खोपटच्या राजाने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्सवाला भेट देऊन पहिल्याच वर्षी यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला दही हंडी उत्सव आज जागतिक स्तरापर्यंत पोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आंब्रे, टेन एक्स हॅबिटंट, खेड तालुका रहिवाशी संघ आणि प्रभाग क्र. ७ मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने दहीहंडी उत्सव भरविण्यात आला आहे. या उत्सवाला सकाळपासून सुरूवात झाली. मुंबई-ठाणे शहरातील अनेक गोविंदा पथकांनी उत्सवासाठी गर्दी केली होती. त्यात ठाण्यातील सहयोग मित्र मंडळ-लक्ष्मी-चिरागनगर, साईप्रसाद मित्र मंडळ यांनी ८ थरांची सलामी दिली. तर अनेक मंडळांनी ७ व ६ थरांची सलामी देऊन उत्साह वाढविला. काही महिला पथकांनीही सलामी दिली. हिरकणी महिला पथकाने पाच थर वेगाने रचून नागरिकांच्या टाळ्या मिळविल्या.
रेमंड संकुलात दुपारी खोपटचा राजा मित्र मंडळाचे आगमन झाल्यावर ९ थर लावून सलामी देणार असल्याचे जाहीर झाले. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात ९ थर रचल्यास तीन लाखांऐवजी पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली होती. या गोविंदा पथकाने पद्धतीशीर व शिस्तबद्ध पद्धतीने मनोरा रचण्यास सुरुवात केली. शांतपणे एकमेकांना प्रोत्साहन देत पथकाने लिलया नऊ थर रचले. तुर्या चौधरी या मुलीने नवव्या रथावरुन हात उंचावताच हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या उत्कंठावर्धक थराचे साक्षीदार झाल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.
या उत्सवाला आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर अशोक वैती, परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्यासह मान्यवर नेत्यांनी भेट देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. तसेच पहिल्याच वेळी भव्य आयोजनाबद्दल तुकाराम आंब्रे यांचे कौतुक केले.