खिचडी, बॉडीबॅग खरेदीत घोटाळा करणारेच खरे भ्रष्टाचारी – खा. नरेश म्हस्के

0

ठाणे : कोविड काळात खिचडीमध्ये घोटाळा, बॉडीबॅग खरेदीमध्ये घोटाळा करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टीपण्णी करण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज उबाठा गटावर केला. ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के म्हणाले की, आपण महापौर असताना ठाणे महापालिकेने कोरोना काळात ३५० रुपयांनी बॉडीबॅगची खरेदी केली मात्र त्याच कंपनीची बॉडीबॅग मुंबई महापालिकेने ७००० रुपयांना खरेदी केली. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण जेलमध्ये गेला. तो कोणाचा मित्र आहे. पत्रचाळ घोटाळ्यात संजय राऊत जेलमध्ये गेले. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिंदे यांच्यावर बोलण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार नाही, असे खासदार म्हस्के यांनी खडसावले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईच्या नियोजन बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावलले जात होते, असा गौप्यस्फोट खासदार म्हस्के यांनी यावेळी केला. यासंदर्भात संजय राऊत यांच्याकडे विचारले असता मुंबई महापालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे, सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्र परिवार घेणार, एकनाथ शिंदेंना सांग मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका, हा माझा निरोप दे, असे वक्तव्य राऊत यांनी केल्याचा दावा खासदार म्हस्के यांनी केला.

खासदार म्हस्के म्हणाले की, संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम द्वेष केला. राऊत यांच्या मुलाखतीमुळेच दिघे यांना टाडा लागला. त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणे कधीच शक्य नाही, असे खासदार म्हस्के म्हणाले. याउलट हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते, असे खासदार म्हस्के म्हणाले. बाळासाहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसातही मुंबई आणि ठाण्यात केलेल्या कामाचे कौतुक केले, असे खासदार म्हस्के म्हणाले.

एकनाथ शिंदे भरपावसात धावपळ करत आहेत मात्र माझ्याच जिवावर मोठे झालेले, खासदारकी मिळवणारे, इतकी वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणारे घरकोंबड्यासारखे घरात बसलेत. समाजकारणाचे मी दिलेल्या तत्वाचे पालन करत नाहीत, हे माझे शिष्य होते याची मला लाज वाटते, याउलट एकनाथ शिंदे यांचा गर्व वाटतो, असे उद्गार बाळासाहेबांनी काढले. पाकिस्तानची भाषा संजय राऊत बोलतोय, पाकिस्तानची बाजू घेतोय मी जर असतो तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी स्वत: मुंबईत बोलावून सत्कार केला असता. आपली लोकं पाकिस्तानची भाषा बोलतात त्यांना हिंदुस्थानच्या जनतेने जोड्याने हाणले पाहिजे, अशी वक्तव्य बाळासाहेबांनी स्वप्नात येऊन केली, असे खासदार म्हस्के म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech