एसआरएची स्थगिती करण्याच्या निर्णयाला ; माजी आमदार नरेंद्र पवार यांचा पाठपुरावा
कल्याण : कल्याण पश्चिमेत गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या शांतीदूत सहकारी गृहनिर्माण सोसायटीची सध्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला एस.आर. ए अर्थातच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. म्हाडा उपनिबंधकांनी बिल्डरच्या संगनमताने बरखास्तीचा निर्णय दिल्याचे सांगत सध्याच्या कार्यकारिणीने त्या विरोधात एस.आर.ए.कडे स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. ज्यावर सुनावणी होऊन एस.आर.ए.ने म्हाडाच्या या निर्णयाला स्थगिती दिल्याची माहिती याप्रकरणी शासन स्तरावर पाठपुरावा करणारे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे.
या शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीतील १२ पदाधिकारी – सदस्यांना म्हाडाच्या उपनिबंधकांनी व्यवस्थापन समिती सदस्य पदावर राहण्यास पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचा आणि या संस्थेवर संजय आडारकर यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा आदेश २ जून २०२५ रोजी दिला होता. या निर्णयाविरोधात सध्याच्या कार्यकारिणी समितीने एस.आर.ए. कडे अर्ज दाखल केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान संजय आडारकर यांनी या संस्थेच्या कामकाजाचा पदभार घेतल्यास अर्जदारांचे भरून न येणारे नुकसान होऊ शकते. मात्र प्रतिवादी यांचे कोणतेही नुकसान संभवत नाही. त्यामुळे म्हाडाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा कार्यकारिणीचा युक्तिवाद मान्य करणे योग्य असल्याचे अनुमान एस.आर. ए सहनिबंधकांनी यावेळी नोंदवले.
तसेच अर्जदारांच्या व्यवस्थापन समितीने एकूण १८४ सभासद असलेल्य संस्थेच्या पुनर्विकासासाठी दि. २४/११/२०१३ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठरावाने विकासकाची नियुक्ती केली आहे. मात्र, या विकासकांनी समाधानकारक रित्या काम केले नाही. आणि संस्थेच्या मालमत्तेच्या तारणावर रू. ३२५ कोटींचे कर्ज घेतल्याचेही या सभासदांनी एस आर ए सह निबंधकांच्या निदर्शनास आणून दिले. त्याशिवाय सन २०१७ पासून या विकासकाकडे संस्थेच्या सभासद घरभाडयापोटी रू. १० कोटी 4 लाख एवढी रक्कम थकीत आहे. या सगळ्यासंदर्भात विकासकांविरूध्द संस्थेने दाखल केलेल्या विविध तक्रारी आणि दाव्यांमध्ये या संस्थेच्या वतीने प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे. अन्यथा संस्था आणि सभासद यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते असेही यावेळी सांगण्यात आले. तर तक्रार अर्जदार बागवे हे संस्थेचे तत्कालीन सचिव असतांना त्यांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता अनेक कागदपत्रे स्वाक्षरी करून विकासकांच्या लाभात दिले आहेत, ना-हरकत पत्रे अधिकारदेखील विकासक आणि वित्तीय संस्थाना दिले असल्याचेही यावेळी समिती सदस्यांनी सह निबंधकांच्या समोर मांडले.
त्यावर या सर्व गोष्टी लक्षात घेता वैयक्तिक स्वार्थामुळे सोसायटी कमिटीला बरखास्त करण्याचा बागवे यांचा हेतु असून संस्था आणि सभासदांच्या हितासाठी त्यांचा विरोध अमान्य करून अर्जदारांची स्थगितीची विनंती मान्य करणे आवश्यक ठरते असे म्हणण्यास वाव असल्याचे निरीक्षण एसआरए सह निबंधकांनी नोंदवले. तसेच या सर्व पार्श्वभूमीवर अर्जदार आणि प्रतिवादीच्या युक्तिवादांची शहानिशा करणे शक्य व्हावे, संस्थेच्या दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण न होण्यासाठी तसेच संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी विकासकांविरूध्द दाखल दावे – तक्रारीत संस्थेची बाजु प्रभावीपणे मांडली जावी यासाठी अर्जदारांचा स्थगिती अर्ज मान्य करणे न्यायोचित ठरते असे मत सहनिबंधक, झोपडपट्टी पुंरविकास प्राधिकरण नोंदवत सध्याच्या कार्यकारिणी बरखास्ती निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. दरम्यान एसआरए सह निबंधकांच्या या निर्णयाचे शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीच्या कमिटीने स्वागत केले आहे.