वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड अध्यक्षपदी संदीप भानजी तर उपाध्यक्षपदी महेंद्र लडगे यांची निवड
मंगेश तरोळे-पाटील
मुंबई : मुंबईतील बहुचर्चित असलेल्या वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने ११ मे २०२५ रोजी संस्थेच्या सांस्कृतिक भवनामध्ये पार पडली. निवडून आलेल्या एकूण १५ संचालकांमधून संदीप भानजी यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी महेंद्र लडगे यांची एक मताने निवड करण्यात आली. या संचालक मंडळामध्ये कोळी समाजाचे नेते आणि सागर शक्तीचे संपादक असणारे राजहंस टपके हे सतत ३४ वर्षे या संस्थेवर निवडून येत आहेत. शासकीय निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत वि कोकरे यांच्या नियंत्रणात सन २०२५-२६ते २०२९-३० या कालावधी साठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण ३६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १५ जण संचालक समिती वर निवडून आले.
सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये २६ उमेदवारांपैकी १० उमेदवार बहुमताने निवडून आले. या संस्थेवर सन १९९१ पासून निवडून येणारे राजहंस टपके यांच्यासह महेंद्र लडगे, संदीप भानजी, विजय भानजी, प्रेमनाथ भानजी, सौ नेत्रा भानजी, भरत जांगले, राहुल शिवकर , विक्रांत चिखले, मंगेश भानजी हे बहुमताने निवडून आले. तर महिला राखीव मतदार संघातून सुवर्णा काफर आणि रेश्मा रत्ने या दोघी निवडून आल्या तर विशेष मागास प्रवर्गांमधून ऋषिकेश बांडूक, अनुसूचित जमात विभागातून डॉ अभिजित भानजी आणि इतर मागास प्रवर्गातून उदय माले हे निवडून आले.
वेसावा मढ खाडी दरम्यान सहकारी तत्त्वावर सुरू असणारी फेरीबोट सेवा, या संस्थेच्या अखत्यारित येत असून महापे इंडस्ट्रियल एरिया मध्ये त्यांचा बर्फ कारखाना व शीतगृह आहे. मुंबई बाजारांमध्ये ताजी मासळी वाहतूक व्यवस्थे बरोबरच निरनिराळे प्रकल्प ही संस्था सभासदांसाठी राबवित आहे.