वरळी हिट अँड रन प्रकरण : हायकोर्टाने फेटाळला मिहिर शाहचा जामीन अर्ज

0

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावला. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या एकलपीठानं राखून ठेवलेला निकाल जाहीर करत आरोपीकडून साक्षी पुराव्यांशी छेडछाडीची शक्यता नाकारता येत नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच या गुन्ह्याचा मुख्य साक्षीदार प्रदीप नाखवा यांची साक्ष अद्याप न्यायालयात नोंदवली गेलेली नसल्याने या टप्प्यावर जामीन मंजूर करता येणार नाही, असा ठोस निरीग्रह हायकोर्टानं नोंदवला.

या प्रकरणात ७ जुलैच्या पहाटे मिहिर शाहनं दारूच्या नशेत बीएमडब्ल्यू कार चालवत वरळी परिसरात दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत पाठीमागे बसलेल्या कावेरी नाखवा (४५) या काही अंतरापर्यंत फरफटत गेल्या आणि त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा गंभीर जखमी झाले. धडक झाल्यानंतर मिहिरनं कार न थांबवता वरळी नाक्याहून वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत कावेरी नाखवा यांना फरफटत नेलं आणि नंतर अत्यंत अमानुषपणे त्यांच्या अंगावरून वाहन चढवत घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर फरार झालेल्या मिहिरला ९ जुलै रोजी विरारमधील रिसॉर्टमधून मुंबई पोलिसांनी अटक केली.

सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मिहिरनं हायकोर्टात अपील दाखल केलं होतं. त्याच्या वतीने वकील जय भारद्वाज यांनी गेल्या दीड वर्षांपासून आरोपी तुरुंगात असल्याचा मुद्दा मांडला. तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल झाल्याने पुरावे नष्ट करण्याची शक्यता नसल्याचं त्यांनी सांगितलं. साडेचारशे दिवस न्यायालयीन कोठडीत काढल्यानंतर जामीन मिळायला हवा, अशी विनंती त्यांनी केली.

मात्र राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी जामीनास जोरदार विरोध केला. गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपीचा फरार होण्याचा प्रयत्न, त्याचं वर्तन, राजकीय पाठबळ आणि पुराव्यांशी छेडछाडीची शक्यता या मुद्द्यांवर आधारित युक्तिवाद करत जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती करण्यात आली, जी हायकोर्टानं मान्य केली.

निकालात हायकोर्टानं नमूद केलं की, प्रमुख साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यापूर्वी आरोपीला जामीन देणं योग्य ठरणार नाही. आरोपीची पार्श्वभूमी आणि घटनाकालातील वर्तन पाहता जामीन मंजूर करणे धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे मिहिर शाहचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech