बडगुजर पावन झाले

0

नितीन सावंत

नाशिक शहरातील आणि नाशिक ग्रामीण भागातील अनेक निष्ठावंतांना डावलून शिवसेना नेते संजय राऊत यांनी ज्यांना मोठे केले ते सुधाकर बडगुजर अखेर भाजपमध्ये सामील झाले. ऑक्ट्रॉय नाक्यावरचा एक वसुली कार आणि जीवन प्राधिकरणाचा कंत्राटदार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या सुधाकर बडगुजर यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून नाशिक महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी संपर्क नेते असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी संधान बांधून महानगरपालिकेतील सर्व क्रीमची पदे मिळवली. राऊत यांच्या शिफारशीनेच बडगुजर यांना विधानसभेचे तिकीटही मिळाली. परंतु स्थानिक शिवसेना पदाधिकारी नाराज असल्याने ते विधानसभेत पोहोचू शकले नाही. आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात त्यांनी भरपूर पैसे खर्च केले परंतु नाशिकच्या जनतेने या कंत्राटदाराला विधानसभेत पोहोचू दिले नाही. केवळ सुधाकर बडगुजर यांना मोठे केल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक बाजूला होऊन नाशिकची शिवसेना खिळखीळी झाली.

बडगुजर यांना भाजप मध्ये आणण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विशेष मेहनत घेतली. स्थानिक आमदार सीमा हिरे आणि नाशिक मधील भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्यामुळे गेले पंधरा दिवस सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश लांबत होता. एक वेळ तर अशी चर्चा होती की बडगुजर यांचा प्रवेश आता होणार नाही. बडगुजर यांचा मंगळवारी प्रवेश झाला त्याच दिवशी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांचा प्रवेश आज असल्याची आपल्याला माहिती नाही,असे माध्यमांना सांगितले. तेच बावनकुळे पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना घेऊन प्रवेशासाठी तत्परतेने प्रदेश कार्यालयात हजर झाले. बावनकुळे यांचा मकाऊ मधील फोटो बडगुजर यांनी संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचवला, अशी चर्चा असल्याने बावनकुळे या प्रवेशासाठी टाळाटाळ करत होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देताच बावनकुळे बिन बोभाट प्रदेश कार्यालयात बडगुजर यांचे स्वागत करण्यासाठी हजर झाले.

सुधाकर बडगुजर यांची महानगरपालिकेतील कारकीर्दही वादग्रस्त आहे.बडगुजर यांच्यावर नाशिक नगरपालिकेतील ठेकेदार म्हणून स्वतःच्या कंपनीसाठी अनुचितरीत्या करार मिळवण्याचे आरोप आहेत. २०१६ च्या पॅनल रिपोर्टनुसार, त्यांनी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य असताना स्वतःच्या कंपनीसाठी नागरी ठेके मिळवले, असा आरोप आहे.यासंदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (ACB) आणि पोलिसांनी फसवणूक व जालसाजीचे गुन्हे दाखल केले आहेत. काही प्रकरणांत त्यांच्या घरावर छापेही टाकण्यात आले होते.बडगुजर यांनी आरोप फेटाळले असून, “आरोप सिद्ध झाले तर मी सार्वजनिकरित्या आत्महत्या करीन,” असे विधान केले होते. २०१४ लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या प्रकरणात २०२३ मध्ये त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्या विरोधात विविध IPC कलमांतर्गत (जसे 341, 143, 147, 148, 307, 395, 120B, 353, 427, 504, 506 इ.) नऊहून अधिक गुन्हे दाखल आहेत. यात मारहाण, फसवणूक, बेकायदेशीर जमाव, सरकारी कामात अडथळा, अपहरण, चोरी, धमकी, इत्यादींचा समावेश आहे.

या प्रकरणांपैकी काही अजून न्यायप्रविष्ट आहेत, तर काहीत शिक्षा झाली आहे.भ्रष्टाचार, फसवणूक, सरकारी कामात अडथळा, आणि गुन्हेगारी संबंधांचे गंभीर आरोप आहेत. दाऊद चा साथीदार आणि सध्या येरवडात तुरुंगात शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता प्रकरण बडगुजर महाशयांवर बरेच शेकले होते. बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. हा मुद्दा सहा महिन्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ही घोषणा अर्थातच आता बासनात गुंडाळली जाणार. आगामी कुंभमेळ्याची विकास कामे लक्षात घेता बडगुजर हे आपल्याला उपयुक्त आहेत याचा विचार करून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला. बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत बरेच संतापले होते. त्यासाठी खास गिरीश महाजन यांच्यावर टीका करणारा अग्रलेख ही शिवसेनेच्या मुखपत्रात अर्थात सामना दैनिकात त्यांनी लिहिला होता. त्यामुळे सुधाकर बडगुजर हे भाजप मध्ये गेल्याचे सर्वाधिक दुःख संजय राऊत यांना झाले असावे.

नितीन सावंत, ९८९२५१४१२४

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech