प्रजासत्ताक दिनी झालेली कारवाई चुकीची; वनमंत्री गणेश नाईक यांनी मागितली जाहीर माफी
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींच्या घरांवरील तोडक कारवाईला स्थगिती
उसगाव – बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींच्या घरांवर प्रजासत्ताक दिनी करण्यात आलेल्या तोडक कारवाईच्या निषेधार्थ काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर श्रमजीवी संघटनेकडून न्यायाची दाद मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष (मंत्रीदर्जा) आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई पुढे ढकलण्याचे आदेश दिले. परंतु आज पुन्हा सकाळी आठ वाजल्यापासून एसआरपी, वनविभाग व पोलीस यंत्रणा कारवाईसाठी सज्ज झाली असतानाच, आज दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीची बैठक बोलावली आणि आदिवासींच्या घरांवरील तोडक कारवाईला स्थगिती देण्याचे स्पष्ट आदेश दिले.
या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे त्याच ठिकाणी व त्यांच्या इच्छेनुसार पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती मांडण्यात आली. संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी २०१५ साली ऐच्छिक मरणाची मागणी केल्याचा संदर्भ देत, “घरं पाडण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला,” असा तीव्र सवाल करीत प्रजासत्ताक दिनीच आदिवासींच्या घरांवर बुलडोझर फिरवल्याचा निषेध वनमंत्र्यांसमोर उपस्थित केला.
यावर प्रतिक्रिया देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रजासत्ताक दिनी वनअधिकाऱ्यांकडून झालेली तोडक कारवाई चुकीची असल्याची स्पष्ट कबुली देत, या कारवाईबाबत जाहीर माफी मागितली. जोपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होऊन आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणतीही तोडक कारवाई करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला दिले.
आज दुपारी १ वाजता झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत विधान परिषदचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार राजेंद्र गावित, आमदार संजय उपाध्ये, माजी खासदार गोपाळ शेट्टी तसेच श्रमजीवी संघटनेच्या व विवेक पंडित यांच्या वतीने श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, नलिनी बुजड तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक (CCF) अनिता पाटील, सचिव म्हैसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.