लाहोर : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर फवादला आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतानंतर ‘अबीर गुलाल’वर आता पाकिस्तानातही बंदी घालण्यात आली आहे.
फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ सिनेमाला सुरुवातीपासूनच भारतात विरोध होत होता. १ एप्रिलला सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानी अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘अबीर गुलाल’वर भारताने बंदी आणली. या सिनेमातील गाणीही युट्यूवरून हटवण्यात आली होती. भारताने ‘अबीर गुलाल’वर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानमध्येही हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे. पण, पाकिस्तानात फवाद खानमुळे नाही तर बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर या सिनेमात असल्यामुळे ‘अबीर गुलाल’वर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘अबीर गुलाल’ सिनेमा येत्या ९मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार होता. या सिनेमात फवाद खान आणि वाणी कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. तर लीजा हेडन, सोनी राजदान, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल, परमीत सौठी अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये झालं होतं. आरती एस बागरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे.