हिंदी भाषा सक्तीवर अभिनेता हेमंत ढोमेचा सरकारला प्रश्न

0

मुंबई : ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’ नुसार यापुढे इयत्ता १ ली ते ५ वीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे. परंतु आता पुन्हा तोच निर्णय नव्या शब्दात जारी केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हिंदी भाषा सक्तीवर अभिनेता हेमंत ढोमे यानं ट्विट करत सरकारला महत्त्वाचा प्रश्न केलाय.

मराठी चित्रपट निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमेनं एक्स अकाऊंटवर महाराष्ट्र शासनाचा जीआर शेअर केला आहे. यासोबत त्यानं लिहलं, “हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी! कृपया हा जीआर नीट वाचा. हिंदी ही तृतीय भाषा असेल. ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान २० इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?) म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही?” असे प्रश्न त्याने केले.

त्यानं लिहलं, “एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर… पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?”, अशी रोखठोक पोस्ट त्यानं शेअर केली आहे. या पोस्टसोबतच हेमंत ढोमेनं #महाराष्ट्रात_मराठीच असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

मंगळवारी (दि.१७) रात्री उशिरा एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला. या निर्णयानुसार, इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य आहे. त्यामध्ये हिंदी हा एक पर्याय असेल. पण जर हिंदी नको असेल, तर वर्गातील किमान २० विद्यार्थ्यांनी दुसरी भाषा निवडायला हवी. नाहीतर, त्यांना हिंदीच शिकावी लागेल. त्यामुळे ही एकप्रकारे हिंदीची सक्ती आहे, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech