मुंबई : ‘सितारे जमीन पर’च्या यशानंतर आमिर खान हा ‘ महाभारत’वर आधारित चित्रपट घेऊन येत आहे.आमिर खान याने अनेकदा ‘महाभारत’ हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता अखेर या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली असून तो लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू करणार आहे. कलाकारांपासून शूटिंगपर्यंत सर्वंच गोष्टींचा आमिर खानकडून खुलासा करण्यात आलाय. आमिर खान येत्या ऑगस्टपासून या प्रकल्पावर काम सुरू करणार आहे. नुकतंच आमिर खानने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याच्या पुढील प्रकल्पाची घोषणा केली. आमिर म्हणाला, “मी ऑगस्ट महिन्यात या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. हा एक चित्रपट नाही तर चित्रपटांची एक सीरिज असेल. कारण महाभारत फक्त एका चित्रपटात सांगता येणार नाही. ही कथा माझ्या रक्तात भिनलेली आहे. कोणीही काहीही बोलो, मला ही कथा सांगावीच लागेल”.
महाभारतात आमिर अर्जुन किंवा कृष्णाची भूमिका करणार का? असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला. यावर त्यानं स्पष्ट केलं की, “नाही. तसेच मी कोणताही ओळखीचा चेहरा घेणार नाही. माझ्यासाठी पात्रंच स्टार असतील. मला अज्ञात चेहरे हवेत. जसे ‘सितारे जमीन पर’मध्ये मी पूर्ण नवीन कलाकार घेतले, तसंच यासाठीही माझा विचार आहे”. आमिर खानचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सितारे जमीन पर’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. प्रदर्शनानंतर केवळ १८ दिवसांत या चित्रपटाने १५० कोटींचा टप्पा पार केला असून, तो आता २०० कोटींकडे वेगाने वाटचाल करत आहे. या चित्रपटात आमिर खानसह जिनिलिया डिसूझा आणि १० नवीन कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळलाय.