मुंबई : अलिकडेचं ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता हा चित्रपट मोठ्या वादात अडकला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट सोडल्याचं सांगितलंय. ते चित्रपटातून बाहेर पडल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. आत यातच अक्षय कुमारने परेश रावल यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. परेश रावल यांनी चित्रपट अर्धवट सोडून दिल्यानं अक्षय कुमारनं परेश रावल यांना तब्बल २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, परेश रावल यांनी आधी चित्रपटासाठी कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता आणि अॅडव्हान्स रक्कमही घेतली होती. शिवाय काही प्रमाणात शूटिंगही झालं होतं. मात्र नंतर अचानक त्यांनी चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागलं.
परेश रावल यांचं हे वर्तन ‘अनप्रोफेशनल’ असल्याचा आरोप अक्षयच्या बाजूने करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर परेश यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “मला इथे स्पष्ट करायचं आहे की ‘हेरा फेरी ३’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय हा मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे घेण्यात आलेला नाही. मी पुन्हा सांगतो की माझे फिल्ममेकर्ससोबत कोणताही क्रिएटिव्ह मतभेद झालेले नाहीत. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम, आदर आणि विश्वासाची भावना आहे”.
अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी ‘हेरा फेरी’सह ‘गरम मसाला’, ‘वेलकम’, ‘भूल भुलैया’ अशा अनेक हिट चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. दोघं लवकरच प्रियदर्शन यांच्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, आता परेश रावल या कायदेशीर नोटीशी काय उत्तर देतात, आणि ‘हेरा फेरी ३’चं भविष्य काय ठरतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.