मुंबई : आजच्या नाते संबंधावर भाष्य करणाऱ्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातील ‘मला तू, तुला मी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेम आणि नात्यांची एक वेगळी, सजीव भावना यातून साकारली गेली आहे. या गाण्यातून एकमेकांबद्दल असलेलं निस्सीम प्रेम प्रकट होतं. कोणत्याही चौकटीत न अडकलेलं हे प्रेम मग ते कोणत्याही नात्याबद्दलचे असो. या गाण्याचे शब्द नात्यांमध्ये असलेल्या अबोल, तरीही ठाम भावनांना शब्दरूप देतात. पारंपरिक चौकटींपेक्षा वेगळ्या नात्यांची ही अनुभूती नात्यांवर नव्याने विचार करायला लावणारी आहे. हृषीकेश कामेरकर, संज्योती जगदाळे यांनी गायलेल्या या गीताला वैभव जोशी यांच्या शब्दांनी आणि अजित परब यांच्या संगीताने अधिकच गहिरेपण प्राप्त केलं आहे. गाण्याच्या चालीत आणि शब्दांत एक शांत भावना आहे, जी प्रेक्षकांच्या मनाच्या खोलवर जाणारी आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे या गाण्याबद्दल म्हणतात, ”हे गाणं म्हणजे फक्त दोन पात्रांमधलं प्रेम नाही, तर एकमेकांना स्वीकारण्याची भावना आहे. ‘मला तू, तुला मी’ ही ओळ म्हणजे कोणतीही नात्याची बंधनं नसतानाही एकमेकांत असलेली दृढ भावना सांगणारी आहे.” चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य म्हणाले, ”आजच्या तरुणाईला प्रेमाची नव्याने ओळख करून देणाऱ्या या गाण्यातून नातं म्हणजे केवळ समाजमान्यता नाही, तर दोन जीवांमधली नाजूक समजूत आहे, हे ठळकपणे अधोरेखित करणारे भाव आहेत. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं आपण कोणालाही समर्पित करू शकतो. मग ते नातं मित्र मैत्रिणीचे असेल, अथवा कुटुंबातील असेल.”‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.