चंदीगड : अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुडा यांची मुख्य भूमिका असलेला ‘जाट’ सिनेमा १० एप्रिल रोजी रिलीज झाला आहे.या सिनेमाने रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली. मात्र काही दिवसातच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली जाट चित्रपटाच्या संपूर्ण टीमवरच आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘जाट’ चित्रपटातील एका दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता सनी देओल, रणदीप हुडा, विनीत कुमार सिंह, दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी आणि निर्माता नवीन येरनेनी यांच्याविरुद्ध पंजाबमधी जालंधरच्या सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’जाट’ चित्रपटात प्रभु येशू ख्रिस्ताचा अपमान केल्याच्या आरोपावरून ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदनही सादर केले. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत तक्रारदाराने आरोप केला आहे की, “‘जाट’ चित्रपटातील क्रूसावर चढवण्याच्या दृश्यात प्रभु येशू ख्रिस्ताची नक्कल केली जाते आणि त्याची खिल्ली उडवली जाते, ज्यामुळे ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात”, असे म्हटले आहे.
चित्रपटातील दृश्यात मुख्य खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता रणदीप हुडा एका चर्चमध्ये पवित्र व्यासपीठावर असलेल्या क्रूसाखाली उभा आहे. तर इतर सदस्य प्रार्थना करताना दिसत आहेत. त्यात चर्चमध्ये गुंडगिरी आणि धमकीचे चित्रीकरण देखील आहे, जे समुदायाला अत्यंत आक्षेपार्ह वाटले आहे. यापूर्वी, ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी या दृश्यावर आक्षेप घेतला होता आणि चित्रपटावर बंदी घालण्याची धमकी दिली होती. त्यापैकी अनेकांनी जाट चित्रपटातील “हे दृश्य चर्चच्या सर्वात पवित्र जागेचे – व्यासपीठाचे अपवित्रीकरण आहे”, असे देखील म्हटले होते.