संघाला शुभेच्छा दिल्यामुळे संजय दत्त टार्गेट

0

काँग्रेसकडून करण्यात आली शिवीगाळ
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकी स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल अभिनेता संजय दत्त याला विखारी टीकेचा सामना करावा लागतोय. काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विटरवर संजय दत्त यांना नालायक म्हंटले आहे. गेल्या २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी संजय दत्त यांनी ट्विटरवरून (एक्स) एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी संघाची स्तुती करत म्हटले होते की, “संघ नेहमी देशाच्या सोबत उभा राहिला आहे, विशेषतः आपत्ती आणि कठीण काळात.” संजय दत्त यांची पोस्ट देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये संताप पसरला आहे. काँग्रेस नेते सुरेद्र राजपूत यांनी यासंदर्भात ट्विटरवर संदेश जारी करत “नायक नही खलनायक है तू, अपने पिता का नालायक है तू” अशा शब्दात संजयवर विखारी टीका केलीय. संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसकडून खासदार होते. त्यांची बहीण प्रिया दत्त देखील काँग्रेस पक्षाच्या नेत्या असून समाजसेविका आहेत.

दुसरीकडे, संजय दत्त यांचे नाव अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये आले आहे. त्यामधील सर्वात गाजलेला प्रकार म्हणजे १९९३ चा मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण होय. त्यावेळी त्यांच्यावर बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि त्यांना टाडा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना टाडा अंतर्गत निर्दोष ठरवण्यात आले, पण आर्म्स ॲक्ट अंतर्गत दोषी ठरवून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. दरम्यान काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेवर अद्याप संजय दत्त यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech