मुंबई : नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी “कप बशी” या चित्रपटांतून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे.
“कप बशी” या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांची असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असला, तरी त्यांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं जुनंच आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या “पुत्रवती” या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केलं होतं. त्या चित्रपटानं राष्ट्रीय, राज्यस्तरीय १४ पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यात फिल्मफेअर, स्क्रीन, राज्य पुरस्काराचा समावेश होता. त्यामुळे वडिलांचं प्रेरणादायी काम आणि त्यांचा कलात्मक वारसा आता ‘कप बशी’ या चित्रपटातून ते पुढे आणत आहेत.
वैभव चिंचाळकर हे टीव्ही मालिका, नाटक, मराठी चित्रपटातलं सुपरिचित नाव आहे. वैभव यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाइन, पुढचं पाऊल अशा अनेक गाजलेल्या मालिका, पुष्पक विमान या चित्रपटसाठी दिग्दर्शन केले होते. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभवचं नाव घेतलं जातं. आता “कप बशी” या चित्रपटातून वैभव कोणती नवी गोष्ट सादर करतो याची उत्सुकता आहे.
पूजा सावंतनं अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. तर ऋषि मनोहरनं टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटांतून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. त्यामुळे या दोघांची फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतुहल आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही.