हैदराबाद : प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता राणा दग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मंचू या चार अभिनेत्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.यांनी बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराशी संबंधित अॅप्सचे प्रमोशन केल्याचा आरोप आहे. मिळलेल्या माहितीनुसार, ईडीने राणा दग्गुबातीला २३ जुलै रोजी, प्रकाश राजला ३० जुलै रोजी, विजय देवरकोंडाला ६ ऑगस्ट रोजी तर लक्ष्मी मंचूला १३ ऑगस्ट रोजी हैदराबाद झोनल ऑफिसमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमपीएल) तरतुदींनुसार एजन्सीसमोर हजर झाल्यानंतर, या चारही अभिनेत्यांचे जबाब नोंदवले जातील. मार्च २०२५ मध्ये तेलंगाना पुलिसांनी २५ फिल्मी स्टार्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यांच्यावर सोशल मीडियावर अवैध बेटिंग अॅप्सला प्रमोट केल्याचा आरोप आहे.
ईडी, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) या सर्व स्टार्सचे जबाब नोंदवेल. पाच राज्यांच्या पोलिस एफआयआरची दखल घेत एजन्सीने हा गुन्हा दाखल केला आहे. ईडीचा आरोप आहे की, या स्टार्स मंडळींनी प्रमोट केलेले अॅप्स ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराद्वारे बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये कमवत होते. काही कलाकारांनी आधीच स्पष्ट केले आहे की त्यांना अॅप्सच्या वास्तविक कार्यपद्धतीची माहिती नव्हती आणि कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी होण्याचा त्यांचा हेतू नव्हता. तपासाचा भाग असलेल्या या प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराद्वारे बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये जमवल्याचा आरोप आहे.