मुंबई : टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा असलेले प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. दरम्यान आज, शनिवारी दुपारी २.३० वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या बातमीला दुजोरा देत म्हटलं आहे की, ते आता या जगात नाहीत. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला.
सतीश शाह यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी मुंबईत झाला होता. ते त्यांच्या कॉमिक आणि अप्रतिम अभिनयासाठी ओळखले जात होते. विशेषतः १९८३ मध्ये आलेल्या चित्रपट ‘जाने भी दो यारों’ मध्ये त्यांनी कमिश्नर डी’ मेलो आणि २००४–२००६ मध्ये लोकप्रिय टीव्ही मालिकेत ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मध्ये इंद्रवदन साराभाई यांची भूमिका साकारल्याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले होते. त्यांनी अभिनय केलेल्या काही महत्वाच्या चित्रपटांमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (१९९५), ‘कल हो ना हो’ (२००३), ‘मैं हूं ना’ (२००४) आणि ‘ओम शांति ओम’ (२००७), ‘हम साथ साथ है’ यांचा समावेश होतो. या चित्रपटांमध्ये त्यांनी दिलखेच आणि स्मरणीय भूमिका साकारल्या.
सतीश शाह यांनी फक्त चित्रपटांमध्येच नाही, तर मोठ्या पडद्यावरही आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांच्या करिअरमधील काही चित्रपटांनी त्यांना धक्का दिला. ज्यामध्ये विशेषतः २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हमशकल्स’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. या चित्रपटाच्या अपयशाने त्यांना व्यथित केले. त्यानंतर त्यांनी काही काळ मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले नाही. मात्र ‘रंगून’ आणि इतर काही चित्रपटांमध्ये त्यांच्या लहान भूमिकांमध्ये त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. ‘जाने भी दो यारों’ हा चित्रपट भारतीय सिनेमातील कल्ट क्लासिक मानला जातो. कमी बजेट असूनही त्याने सामाजिक व्यंग आणि हास्याचा अप्रतिम संगम दाखवला. ४० वर्षांनंतरही तो प्रासंगिक आहे आणि प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्याने कुंदन शाह यांना ओळख दिली आणि अभिनेत्यांना नवीन उंचीवर नेलं.
चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली
चतुरस्त्र अभिनेते म्हणून सतीश शाह यांनी सिने, नाट्यसृष्टीत आपला वेगळा असा अमिट ठसा उमटविला आहे. सहज-सुंदर अभिनायातून साकारलेल्या भूमिकांच्या रुपांमध्ये ते रसिकांच्या मनांत चिरंतन राहतील, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सतीश शाह यांनी चित्रपट सृष्टी, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांत काम करताना रसिकांची दाद मिळवली. विनोदी, सहज-सुंदर, निखळ मनोरंजनात्मक भूमिका ते चरित्र अभिनेता अशी त्यांची वाटचाल राहीली. निखळ आणि भूमिकांना न्याय देणारा प्रामाणिक अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. मराठी चित्रपट सृष्टीच्या गौरवात भर घालणाऱ्या स्व. दादा कोंडके यांच्या चित्रपटात त्यांनी भूमिका वठवून मराठी रसिकांचीही दाद मिळवली. शाह यांच्या निधनामुळे कला क्षेत्राची हानी झाली आहे. या क्षेत्रातील पिढ्यांना जोडणारा एक मार्गदर्शक दुवा निखळला आहे. शाह यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, या सर्वांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थना करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.