अमेरिकन प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू

0

वॉशिंग्टन : अमेरिकन टीव्ही मालिकांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता मॅलकॉम-जमाल वार्नरचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं आहे. कोस्टा रिका या देशातील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असताना मॅलकॉम समुद्रात बुडाला, आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मॅलकॉमच्या चाहत्यांना आणि सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मॅलकॉम आपल्या कुटुंबासोबत कोस्टा रिका येथील कोक्लेस बीच येथे गेला होता. समुद्रकिनारी फिरताना अचानक लाटांच्या प्रवाहात तो अडकला आणि बाहेर येऊ शकला नाही. काही वेळातच लोकांनी त्याला बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मॅलकॉम-जमाल वार्नरने १९८४ ते १९९२ दरम्यान चाललेल्या प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम ‘द कॉस्बी शो’ मध्ये थिओ हक्स्टेबल ही व्यक्तिरेखा साकारली होती.  ही भूमिका त्याला खूप प्रसिद्धी मिळवून देणारी ठरली.त्यानंतर त्याने इतर अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांतही काम केलं. अभिनेता, लेखक, कवी आणि संगीतकार म्हणूनही मॅलकॉमला ओळखलं जात होतं.  त्याला संगीतक्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाला होता. मॅलकॉमच्या दुर्दैवी निधनामुळे हॉलीवूडसह अनेक क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅलकॉमला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी या दुखद घटनेची माहिती दिली असून, खाजगी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech