लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर; मधुकर खामकर यांना जीवनगौरव

0

मुंबई : लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळ्यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी लावणी आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवर कलावंतांना लावणी गौरव आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी शाहीरी परंपरेतील जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत, तर लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे, पुरुष लावणी कलाकार आनंद साटम, निर्माते उदय साटम, वादक धीरज गोरेगांवकर, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निवेदक भरत उतेकर, लोककलेसाठी सुनिल ढगे, नेपथ्य तंत्रज्ञ म्हणून सुनील देवळेकर या कलाकारांना लावणी गौरव २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे या कलाकार दांपत्याचा राजाराणी – २०२५ या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

तसेच सदर सोहळ्यात कलाकारांच्या इयत्ता दहावी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. सोबत महासंघाच्यावतीने आयोजित नवरात्र सोहळ्यातील नवरंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे. सदर सोहळ्यात मुंबईतील नामवंत कलाकारांच्यावतीने दिमाखदार नृत्यविष्कारासह सांगितिक कार्यक्रम सुद्धा सादर होणार आहे, असे अध्यक्षा कविता घडशी यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech