मुंबई : देशभक्तीवर आधारित बहुप्रतीक्षित ‘बॉर्डर 2’ या चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबत आता अभिनेत्री मेधा राणा झळकणार आहे. सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मेधा राणा ही वरुण धवनच्या प्रेमिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
मेधा राणा ही यापूर्वी शांतनु माहेश्वरीसोबत ‘इश्क इन द एअर’ या एमएक्स प्लेयरवरील वेब सिरीजमध्ये दिसली होती. त्यानंतर बाबिल खानच्या ‘फ्रायडे नाईट प्लॅन’ या चित्रपटातही ती झळकली होती. आता मेधासाठी ‘बॉर्डर 2’ हा एक मोठा ब्रेक ठरणार आहे. युद्धपटाच्या पार्श्वभूमीवर तयार होत असलेल्या या मोठ्या बजेटच्या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी मेधाच्या अभिनयाचं आणि तिच्या भाषेवरील पकडीचं कौतुक करताना सांगितलं की, “मेधा एका सैन्य कुटुंबातून आली आहे आणि तिला प्रादेशिक भाषेचं उत्तम ज्ञान आहे. आमचं हे पात्र समजून घेण्यासाठी आणि निभावण्यासाठी तिच्याकडे असलेली इमोशनल रेंजही प्रभावी ठरली आहे.”
‘बॉर्डर 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग करत आहेत. जे. पी. दत्ता आणि भूषण कुमार यांचं या चित्रपटाच्या निर्मितीत योगदान आहे. हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे ‘बॉर्डर 2’ हा १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’चा थेट सिक्वेल नसून, एका नव्या कथानकावर आधारित नवीन चित्रपट आहे. त्यामुळे सनी देओल ही यात वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.