नवी दिल्ली : काश्मिरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वच हादरले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर एकानंतर एक कारवाई करायला सुरुवात केली.आता भारताने पाकवर डिजिटल स्ट्राईकही केला आहे. आता पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. माहिरा खान, हानिया आमिर या पाकिस्तानी अभिनेत्री भारतातही प्रसिद्ध आहेत. मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती असताना भारताने हा मोठा निर्णय घेतला आहे.
अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा हिंदी सिनेमा रिलीज होणार होता तो त्यावर आधी बंदी आली. सिनेमातील गाणीही युट्यूबवरुन काढून टाकण्यात आली. तर आता पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही भारतात दिसू शकणार नाहीत. अनेक भारतीय या पाकिस्तानी कलाकारांना फॉलो करत होते त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्समध्येही घट झाली असू शकते. यामध्ये फवाद खान, मावरा होकेन, आतिफ अस्लम यांचे मात्र अद्याप अकाऊंट बॅन करण्यात आलेले नाहीत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ या पाकिस्तानी कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं होतं. भारत सरकारने आतापर्यंत १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनलही ब्लॉक केले आहेत. यामध्ये जियो न्यूज, डॉन न्यूज, समा चीव्ही आणि एआरवाय न्यूजसह काही मी़डिया साईट्स, चॅनलचा समावेश आहे.