नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार-पति राघव चड्ढा हे दोघंही आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी पूर्णतः सज्ज आहेत. या बातमीची घोषणा परिणीती आणि राघवने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून केली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक कोलॅब पोस्ट शेअर केली असून त्यात “1 + 1 = 3” असं लिहिलेला एक गोल केक आणि त्याखाली दोन छोटेसे सोनसळी रंगाचे पावलांचे ठसे असलेली एक गोंडस प्रतिमा शेअर केली आहे. पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आमचा छोटासा ब्रह्मांड… आता पुढे जात आहे. भरपूर आशीर्वाद.” याचसोबत त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते दोघं एका पार्कमध्ये हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहताच चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.
या पोस्टवर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि राजकारणातील दिग्गजही शुभेच्छा देताना दिसत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी २०२३ मध्ये डेटिंग सुरू केली होती. मे २०२३ मध्ये, त्यांनी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये साखरपुडा करून त्यांच्या नात्याला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये, राजस्थानच्या उदयपूरमध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न केले. गेल्या अनेक महिन्यांपासून परिणीती चोप्राच्या प्रेग्नंसीबाबत चर्चांना उधाण आले होते. याचदरम्यान “द ग्रेट इंडियन कपिल शो” मध्ये जेव्हा हे कपल एकत्र पाहायला मिळालं, तेव्हा राघव चड्ढा म्हणाले होते. लवकरच गोड बातमी देऊ, हे ऐकून परिणीती देखील आश्चर्यचकित झाली होती.