हैदराबाद : ज्येष्ठ अभिनेते, विनोदी कलाकार आणि माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे रविवारी सकाळी हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने तेलगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दक्षिण भारतातील चित्रपटांत राजकारणी, गँगस्टर अशा भूमिकांमध्ये कोटा श्रीनिवास राव यांचे नाव आघाडीवर होते. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला. राव यांनी दोन दिवसांपूर्वीच ८३ वा वाढदिवस साजरा केला होता. कोटा श्रीनिवास राव यांचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांचे चाहते खूप चिंतेत पडले होते. या फोटोमध्ये दिवंगत अभिनेत्याच्या एका पायावर पट्टी बांधलेली होती आणि दुसऱ्या पायावरही जखमांच्या खुणा होत्या.
७५० सिनेमे आणि राजकीय प्रवास : कोटा श्रीनिवास राव हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते. त्यांनी १९७८ मध्ये ‘प्रणम खारीदू’ या चित्रपटातून पदार्पण केले. ४० वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी ७५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९९९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तत्कालीन एकत्रित आंध्र प्रदेशातील विजयवाडा ईस्ट मतदारसंघातून १९९९ ते २००४ पर्यंत ते आमदार होते. दम्मू’, ‘सन ऑफ सत्यमूर्ती’ आणि ‘डेंजरस खिलाडी’ हे त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी काही चित्रपट आहेत. खलनायक म्हणूनही त्यांच्या अनेक भूमिका संस्मरणीय आहेत. २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
कोटा श्रीनिवास राव यांचा जन्म १० जुलै १९४२ रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराजवळील कंकीपाडू या गावात झाला. त्यांनी १९७८ मध्ये प्रणम खरीडू या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. मात्र प्रतिकारण या चित्रपटातील कसैय्या या पात्राने त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली. तेलुगू चित्रपटसृष्टीत कोटा श्रीनिवास राव आणि दुसरे माजी आमदार बाबू मोहन यांची विनोदी जोडी खूप गाजली होती. कोटा श्रीनिवास राव, भाजप नेते आले नरेंद्र आणि काँग्रेस नेते द्रोणम राजू सत्यनारायण हे तेगिंपु या चित्रपटात झळकले होते, ज्यात भानुचंदर मुख्य भूमिकेत होते.
मुख्यमंत्री नायडूंकडून शोक व्यक्त
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट केले की, “आपल्या बहुमुखी भूमिकांनी चित्रपट प्रेक्षकांचे प्रेम जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. जवळजवळ चार दशकांपासून चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांचे कलात्मक योगदान आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय राहतील. खलनायक म्हणून त्यांनी साकारलेल्या असंख्य संस्मरणीय भूमिका तेलुगू प्रेक्षकांच्या हृदयात कायमच्या कोरल्या जातील. त्यांचे निधन तेलुगू चित्रपट उद्योगाचे नुकसान आहे. १९९९ मध्ये, त्यांनी विजयवाडा येथून आमदार म्हणून विजय मिळवला आणि जनतेची सेवा केली. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो.”