मुंबई : अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या घरात एका अज्ञात महिलेने प्रवेश केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दुबईतील एका महिलेला ताब्यात घेतले आहे.दरम्यान, पोलीस चौकशीत तिने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. यामुळे तिने आदित्य कपूरच्या भेटीचा केलेला प्रयत्न हा गुन्हेगारी हेतूने असू शकतो. लवकरच तिला अटक करू आणि न्यायालयात हजर करू, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २६ मे रोजी आदित्य रॉय कपूर हा शुटिंगसाठी बाहेरगावी गेला होता. सायंकाळी त्याच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरी एका अज्ञात महिला आली. यावेळी आदित्य रॉय कपूरच्या घर कामगार संगीता पवार यांनी दरवाजा उघडला. महिलेने आदित्य रॉय कपूर यांचे घर हेच आहे का अशी विचारणा केली. तसेच आपण आदित्यला कपडे आणि भेटवस्तू देण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले. त्यामुळे संगीता पवार यांनी तिला घरात प्रवेश दिला. मात्र तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का, अशी पवार यांनी विचारणा केली असता. मला सायंकाळी ६ वाजता भेटायचे असल्याचे सांगितले.
काही वेळातच आदित्य कपूर हा घरी आला. यावेळी त्याला वाट पाहत बसलेल्या महिलेबद्दल सांगण्यात आले. यावेळी या महिलेने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुनंदा पवार यांनी तिला घराबाहेर जाण्यास सांगितले; परंतु तिने नकार दिला आणि अभिनेत्याला भेटण्याचा आग्रह धरला.पवार यांनी अभिनेत्याच्या घराच्या व्यवस्थापकाला आणि दुसऱ्या व्यवस्थापकाला फोन केला. या घटनेची माहिती खार पोलिसांना देण्यात आली. संगतीा पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध घरात जबरदस्तीने घुसखोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला नोटीस बजावली.
संबंधित महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली. यावेळी तिने तिचे नाव गजाला झकारिया सिद्दीकी असल्याचे सांगितले. दुबईतील लिवान येथील रहिवासी असल्याचा दावाही तिने केला. तिने पोलिसांना कोणताही समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे तिने आदित्य कपूरच्या भेटीचा केलेला प्रयत्न हा गुन्हेगारी हेतूने असू शकतो. रात्रीची वेळ असल्याने आम्ही तिला नोटीस बजावली आहे, पण आम्ही लवकरच तिला अटक करू आणि न्यायालयात हजर करू,” असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.