२३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार, भारत सरकारने आज दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना २०२३ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित केला. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात येत आहे. २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. सुवर्णकमळ पदक, शाल आणि १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहनलाल यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करताना आपल्याला आनंद वाटत असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मोहनलाल यांचा चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांची अतुलनीय प्रतिभा, अष्टपैलुत्व आणि अथक परिश्रम यांनी भारतीय चित्रपट इतिहासात एक सुवर्ण मापदंड प्रस्थापित केला आहे.
मोहनलाल विश्वनाथन नायर (जन्म : २१ मे १९६०, केरळ) हे ख्यातनाम भारतीय अभिनेता, निर्माता आणि पार्श्वगायक आहेत, जे मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. “पूर्ण अभिनेता” म्हणून ओळखले जाणारे, मोहनलाल यांनी आपल्या जवळजवळ पाच दशकांच्या कारकिर्दीत 360 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, किरीदम, भरतम, वनप्रस्थम, दृश्यम आणि इतर चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत. मोहनलाल यांनी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांसह भारत आणि परदेशात अनेक सन्मान मिळवले आहेत. १९९९ साली प्रदर्शित झालेला त्यांचा ‘वानप्रस्थम’ हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. चित्रपटांव्यतिरिक्त, २००९ साली त्यांना भारतीय प्रादेशिक लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आले. भारत सरकारने त्यांना २००१ साली पद्मश्री आणि २०१९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. आज, मोहनलाल हे भारतातील सर्वात आदरणीय सांस्कृतिक आयकॉन आहेत, त्यांच्या बहुमुखी प्रतिभेसाठी, नम्रतेसाठी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील चिरस्थायी योगदानासाठी त्यांची प्रशंसा होत आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार : दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ या भारतातील पहिल्या पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. १९६९ मध्ये देविका राणी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणारे हे चित्रकर्मी, भारतीय सिनेमाची निर्मिती आणि विकासात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ओळखले जातात. दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीचे मिथुन चक्रवर्ती, शंकर महादेवन आणि आशुतोष गोवारीकर हे सदस्य आहेत.