‘वॉर 2’ने ‘कुली’ला दिली जबरदस्त टक्कर

0

मुंबई : बॉक्स ऑफिसवर दोन बिग-बजेट चित्रपटांची जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. रजनीकांतचा ‘कुली’ आणि ऋतिक रोशनचा ‘वॉर 2’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी दोन्ही चित्रपटांनी प्रचंड गल्ला जमवला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्यदिनी ‘वॉर 2’ने दमदार कामगिरी करत आपली पकड मजबूत केली. तरीदेखील ‘कुली’चं वर्चस्व कायम असल्याचं दिसतंय. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही चित्रपटांनी स्वातंत्र्यदिनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

‘वॉर 2’ बॉक्स ऑफिस कलेक्शन : ‘वॉर 2’ ने भारतात पहिल्या दिवशी तब्बल ५२ कोटी रुपयांची कमाई केली होती. यामध्ये हिंदीतून २९ कोटी आणि तेलुगूतून २२.७५ कोटींचा मोठा वाटा होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने थोडीशी वाढ नोंदवत जवळपास ५६.५० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर अभिनित या चित्रपटाने केवळ दोन दिवसांत भारतातून तब्बल १०८ कोटींची कमाई केली आहे.

‘कुली’ बॉक्स ऑफिस कलेक्शन : रजनीकांतच्या ‘कुली’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी थोडी घसरण दिसली. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी चित्रपटाने ६५ कोटी रुपयांची दमदार ओपनिंग केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्यदिनी या चित्रपटाची कमाई घटून ५३.५० कोटींवर आली. त्यामुळे दोन दिवसांत ‘कुली’चा एकूण गल्ला ११८.५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’मध्ये रजनीकांतसोबत नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहिर आणि उपेंद्र यांच्या भूमिका आहेत, तर आमिर खानचा सरप्राइज कॅमिओ प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. दुसरीकडे, अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर 2’मध्ये ऋतिक रोशन, ज्युनियर एनटीआर, कियारा आडवाणी आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ३०० कोटी रुपयांहून अधिक बजेटमध्ये साकारलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धडाक्यात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech