किरण सोनावणे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी रोजी, विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. असा मृत्यू कुठल्या शत्रूला देखील येऊ नये. इतका भयंकर हा मृत्यू होता. त्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अशा मृत्यूच्या वास्तव आणि कल्पनेन लाखो लोक अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामती येथील विद्या निकेतन मध्ये एकवटले आणि हळहळले.
दादांच्या मृत्यूची राख थंड होण्यापूर्वीच त्यांचा वारसदार, राजकीय समीकरण हालचाली सुरू झाल्या उद्या संध्याकाळी दादांच्या पत्नी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, नंतर त्या बिनविरोध निवडून येतील, त्यांचा मुलगा पार्थ पवार राज्यसभेवर जाईल आणि आपण भारतीय लोक छान झाले , न्याय मिळाला. माणुसकी जिवंत आहे, लोक अजूनही चांगले आहेत यावर विश्वास ठेवत विसरून जाऊ, राहिली तर एक घटना म्हणून ती नमूद राहील .
पण माझे मत आहे की अजितदादा पवार यांचा मृत्यू हा अपघात नसून तो भारतीय विमान व्यवस्था देखरेख विभागाने केलेला खून आहे. होय मी पुन्हा बोलतो आहे , हा भ्रष्ट, अपुऱ्या , अप्रामाणिक आणि व्यवस्थेतील त्रुटीनी केलेला खून आहे. कसा ते सांगण्याच्या आधी मी देशातील पहिला विमान अपघात देश स्वातंत्र्य होण्याच्या दोन वर्ष आधी १९४५ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस ही सामान्य असामी नव्हती, जागतिक पटलावर दखल पात्र अशी व्यक्ती होती. हिटलर पर्यंत त्यांच नाव होतं, अतिशय विद्वान, त्याकाळातील IAS परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील भारतीय स्वातंत्र्यासाठी आयुष्य पणाला लावणारा महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या मृत्यूची चर्चा त्याकाळात आणि नंतरही खूप झाली. त्यानंतर स्वतंत्र भारतातील पहिला विमान अपघाताचा बळी अन्य कुणी नाही, तर खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी जे स्वतः पायलट होते, त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर २००१ मध्ये विमान विभागाचे मंत्री माधवराव सिंधिया यांचा मृत्यू झाला. २००२ मध्ये लोकसभेचे स्पीकर बालयोगी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. २००५ मध्ये हरियाणा ऊर्जा मंत्री ओ पी जिंदाल आणि शेती मंत्री सुरेंद्र सिंग यांचे हेलिकॉप्टर पडून मृत्यू झाला. २००९ मध्ये वाय, एस आर रेड्डी या प्रभावी मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर क्रशेड होऊन मृत्यू झाला. २०११ मध्ये दोरजी खांडु, अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री यांचा हेलिकॉप्टर क्रशेड होऊन मृत्यू झाला. काही महिन्यापूर्वी गुजरात मध्ये महाभयंकर अपघात होऊन ४३३ लोक मरण पावले आणि काल परवा घडलेला विमान अपघात आणि इतर शेकडोनी लहान मोठे अपघात झालेच आहेत. यासर्वाचा अर्थ देशातील विमान व्यवस्था नियंत्रित करणाऱ्या प्रशासनाला देशातील नागरिकांची सोडा, देशातील महत्वपूर्ण व्यक्तींच्या जीवाची देखील किंमत नाही.
हे मी का बोलतो आहे, याचे कारण गुजरात मधील महाभयंकर अपघाताच्या नंतर देशातील विमान व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जी समिती नेमली होती त्याचा रिपोर्ट समितीने संसदेच्या पुढे मांडला आणि हा रिपोर्ट अत्यंत चिंताजनक असून देशातील विमान व्यवस्थे मध्ये प्रचंड त्रुटी असल्याचे सत्य हा रिपोर्ट सांगतो.
1) DGCA मध्ये ५०% कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत, त्याचे प्रेशर कर्मचाऱ्यावर येत असते. त्यांना आर्थिक आणि प्रशासकीय स्वायत्तता नाही, ज्यामुळे ते चांगले तंत्रज्ञ भरू शकत नाहीत
२) ATCO विमान वाहतूक नियंत्रण करणाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण असून त्यातून त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. शिवाय त्यांच्याकडे असलेली यंत्रणा आधुनिक नाही, नव्या यंत्रणेत विमान उड्डाण संबंधी जे विश्लेषण येते त्याचा अभाव आहे. सध्या AI वर आधारित यंत्रणा प्रगत देशात आहेत जे विमानाला पुढील धोक्याची कल्पना खूप आधी देतात.
३) विमाने खूप जास्त म्हणजे ८४० विमाने आहेत आणि त्यांच्या साठी आपल्या कडे फक्त १६२ विमानतळे आहेत. त्यापैकी महत्वाची विमानतळे सोडली तर ज्या पद्धतीने बारामती विमानतळाची अवस्था आहे त्याच प्रकारची अवस्था अनेक छोट्या विमानतळावर आहेत. त्यामुळे एकाच वेळी अनेक उड्डाणे आल्याने त्यांची व्यवस्था लावणे खूप जिकिरीचे होऊन जाते
४) खाजगी विमान वाहतूक कंपन्या चार्टर , अचानक लागणारी विमान सेवा देणाऱ्या कंपन्या विमानाच्या देखभाल दुरुस्ती कडे मोठ्या प्रमाणात काना डोळा करत असतात, त्यांची वेळोवेळी तपासणी प्रशासनाने करायला हवी ती होत नाही, आता दर तीन महिन्यांनी ही तपासणी केली पाहिजे असे या समितीने सुचवले आहे
वरील समितीचा अहवाल संसदे मध्ये सादर झाला पण त्यानुसार जर तातडीने पावले उचलली गेली असती तर विमानाची पाहणी झाली असती, बारामतीच्या धावपट्टी वरील त्रुटी दूर झाल्या असत्या , त्याठिकाणी ATCO यंत्रणा, रडार यंत्रणा असती किंवा अपडेटेड अधिक कार्यक्षम बसवली गेली असती तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा इतका भयानक आणि दुर्दैवी अंत झाला नसता. नियती वैगरेच्या मागे हलगर्जीपणा लपू शकत नाही असे माझे ठाम आणि स्पष्ट मत आहे. हा भारतीय प्रशासनातील हलगर्जीपणाने केलेला खून आहे. असा हलगर्जीपणा ज्या ज्या क्षेत्रात आहे, तिथे तिथे अव्यवस्था, विस्कळीतपणा, बेशिस्त कारभार आणि प्रत्येक ठिकाणी राजकीय गियर टाकल्याशिवाय हालचाल न करणारी व्यवस्था हे आपल्या देशाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
जर हे असे घडू नये वाटत असेल तर देशातील लोकांनी चार्टर विमाने चालवणारी कॅप्टन महिपाल यांच्या कंपनीचा परवाना रद्द झाला पाहिजे. विमानतळाची पाहणी आणि व्यवस्था ज्या मुख्य अधिकाऱ्याकडे असते त्याला नोकरीतून बरखास्त केले पाहिजे, ज्याच्यावर ATCO ची जबाबदारी मुंबई आणि बारामती अशा दोन्ही ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्याला नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे. ATCO व्यवस्था अद्ययावत करण्यात अडथळा ठरलेल्या अधिकारी आणि विभागाच्या मंत्र्याचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांना आता पर्यंत मंत्री म्हणून ज्या सुविधा दिल्या, मानधन दिले ते त्यांच्याकडून वसूल करून त्यांना पुढील दोन निवडणुका लढविण्यापासून मनाई करण्यात यावी, अशी कडक पावले उचलली तरच व्यवस्था सुधारेल अन्यथा अजून काही दिवस, महिने किंवा वर्षाने अजून एक विमान किंवा हेलिकॉप्टर कोसळले आणि आपण मात्र नियतीला दोष देऊन एक मेसेज सर्वत्र पाठवित राहू
” विमानात प्रवास करण्यासाठी पैसा लागतो, मात्र विमानातून सही सलामत उतरण्यासाठी नशीब लागते” मात्र हे साफ खोटे असून विमानातून सहि सलामत प्रवास करण्यासाठी विमान सुस्थितीत, प्रशासकीय यंत्रणा चोख, अनुभवी वैमानिक आणि योग्य विमानतळ व्यवस्था लागते. नशीब नाही.

किरण सोनावणे,
लेखक शिवसेनेचे प्रवक्ते असून
ज्येष्ठ पत्रकार आहेत
९९२२६६६६०७