हिवाळा आणि वृद्धांचे आरोग्य: हाडांची काळजी आणि वेदना नियंत्रण
तापमानात घट होताच अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये सांधेदुखी, स्नायूंचा ताण आणि हालचाल करताना वेदना वाढतात . हिवाळा अनेकांसाठी त्रासदायक ठरतो कारण या काळात वयामुळे होणारे हाडे आणि सांधे यांचे आजार अधिक तीव्र होतात. ऑस्टियोआर्थ्रायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार या काळात वेदना वाढवतात, त्यामुळे योग्य ऑर्थोपेडिक काळजी घेणे अत्यावश्यक ठरते.
हिवाळ्यात वेदना का वाढतात? : थंड वातावरणात स्नायू आकुंचन पावतात आणि सांध्यातील ल्युब्रिकेशन कमी होते, ज्यामुळे कडकपणा आणि वेदना वाढतात. तसेच हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे व्हिटॅमिन D ची पातळी घटते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे वृद्ध व्यक्तीला दुखापत झाल्यास फ्रॅक्चर होणे किंवा हालचालींमध्ये त्रास होण्याचा धोका जास्त वाढतो.
दीर्घकालीन वेदना आणि हाडांची कमजोरी : वृद्धांमध्ये पाठदुखी किंवा सांधेदुखी सामान्य समस्या आहे. ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडे कमकुवत होतात आणि अगदी किरकोळ धक्काही धोकादायक ठरू शकतो. हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार, कॅल्शियम व व्हिटॅमिन Dची पूर्तता, हलका व्यायाम आणि नियमित तपासणी आवश्यक आहे.
पीआरपी : शस्त्रक्रियेविना प्रभावी उपचार : वृद्ध रुग्णांमध्ये सांधेदुखी कमी करण्यासाठी प्लेटलेट रिच प्लाज्मा उपचार एक आधुनिक आणि प्रभावी पर्याय ठरत आहे. रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स वेगळे करून ते वेदनाग्रस्त भागात इंजेक्शनद्वारे दिले जातात. यामुळे दाह कमी होऊन नैसर्गिक उपचार प्रक्रिया वेगाने होते आणि हालचाल सुधारते. शस्त्रक्रियेपासून दूर राहू इच्छिणाऱ्या रुग्णांसाठी हा उपचार उपयुक्त ठरतो.
हिवाळा आरामदायी बनवण्यासाठी काही सोपे उपाय : उबदार कपडे, हलका व्यायाम, घरातील सुरक्षितता, पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच नियमित ऑर्थोपेडिक सल्लामसलत केल्याने आजार ओळखणे आणि उपचार करणे सोपे होते. वय वाढले म्हणजे त्रास वाढला पाहिजे असे नाही. योग्य काळजी, जीवनशैलीतील बदल आणि PRP सारख्या आधुनिक उपचारांमुळे ज्येष्ठ नागरिक हिवाळ्यातही स्वतंत्र, सक्रिय आणि वेदनारहित जीवन जगू शकतात.

डॉ. आकाश सावजी,
ऑर्थोपेडिक सर्जन, स्काय ऑर्थो अँड स्पाइन क्लिनिक,
रामदासपेठ, नागपूर