
राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचा आखाडा यावर्षी महाराष्ट्रात विशेष राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी काल २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले आहे आणि या निवडणुकांची आज ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आता नागपूर हायकोर्टाच्या खंडपीठाच्या निर्णयामुळे २१ डिसेंबर रोजी होणार आहे. कोर्टाने या निवडणुकांचे निकाल पुढे ढकलल्यामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केले आहे.
या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) आणि विरोधी आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उद्धव सेना) यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. या निवडणुकीत नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी थेट निवडणूक होत आहे. काही ठिकाणी न्यायालयीन याचिकांमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, बारामती, महाबळेश्वर, पुणे, सातारा यांसह २३ नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार—यांनी प्रचारात आश्वासनांचा पाऊस पाडला. या तीन पक्षांनी सर्वाधिक सभा घेतल्या आणि राज्यभर जोरदार प्रचार केला. दुसरीकडे, विरोधी पक्षांचा प्रचार तुलनेने कमकुवत दिसला. विशेषतः सिंधुदुर्ग, पालघर, अंबरनाथ येथे भाजप आणि शिंदेसेनेतील संघर्ष टोकाचा होता.
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहु सदस्य प्रभाग रचना असल्यामुळे याचा सर्वाधिक फायदा सत्ताधारी भाजपला होणार आहे. यामुळे नगरपरिषद निवडणुकीत भाजपची स्थिती मजबूत झाली आहे अंतिम टप्प्यात सर्व पक्षांनी शक्तिप्रदर्शन केले. सभा, जनसंपर्क, रोड शो आणि सोशल मीडियावर जोरदार प्रचार झाला. मुंबई लगतच्या आणि तळ कोकणातील नगरपरिषदांमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील संघर्ष टोकाचा राहिला. कणकवली नगरपंचायत आणि मालवण नगरपरिषद या दोन नगरपालिकांकडे पूर्ण राज्याचे लक्ष आहे. सिंधुदुर्ग म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपचे खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला. ते स्वतः भाजपचे खासदार आहेत तर त्यांचे कनिष्ठ व पुत्र नितेश राणे हे भाजपचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे जेष्ठ बंधू निलेश राणे हे शिंदे सेनेचे आमदार आहेत. मात्र या निवडणुकीत हे दोघेही बंधू आमने-सामने आले आहेत.
खासदार नारायण राणे यांचा भाजपमध्ये योग्य सन्मान होत नाही अशी तक्रार शिंदे चे आमदार निलेश राणे यांची आहे तर आतापर्यंत जो काही आम्हाला राजकीय सन्मान मिळाला तो भाजपमध्येच मिळाला. बाकी कोणत्याही पक्षाने एवढा आमचा सन्मान केला नाही असा दावा भाजपा आमदार आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. खरे म्हणजे खासदार नारायण राणे हे नाराज आहेत. ते लोकसभेवर निवडून गेले असताना त्यांना मंत्री केले गेले नाही त्याचबरोबर सिंधुदुर्गात राजकारण करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे खासदार राणे यांना अजिबात विश्वासात घेत नाहीत. मात्र नितेश राणे यांना मंत्री केल्यामुळे त्यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची पाठराखण करावी लागत आहे.
ठाणे जिल्ह्यातून शिंदे सेनेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः जातीने प्रचार करत आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपरिषदांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री स्वतः आले होते. येथे भाजप आणि शिंदे सेना असा सामना असला तरी शिंदे सेनेला संपवण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्ष भाजपला छुपा पाठिंबा देत आहे. सुरुवातीला या भागात राज ठाकरे यांचा प्रभाव होता. पत्र मात्र आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून येथील सर्व संघटना आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना शिंदे सेनेला संपवण्यात कितपत यश येईल हे येणारा काळच ठरवेल.
पालघर जिल्ह्यातही शिंदे सेनेने आपला प्रभाव कायम ठेवला आहे. पालघर ,डहाणू ,जव्हार आदी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध भाजप असाच सामना आहे. विरोधी पक्ष मात्र या निवडणुका पराभूत मनोवृत्तीतून लढवीत आहेत. राज्यभर नगरपरिषदांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला होता मात्र विरोधी पक्षांचा आवाज राज्यभर कोठेही दिसत नाही. विशेष म्हणजे दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही या निवडणुकांकडे पाठ फिरवल्याचे प्रकर्षाने जाणवते. स्थानिक पातळीवर या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. विरोधी पक्ष मात्र पैसे वाटपात कमी कमी पडत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह जाणवत होता.
नितीन सावंत, ९८९२५१४१२४