महापालिका संग्राम 

0

– नितीन सावंत

रविवारी विधिमंडळाचे अधिवेशन आटोपताच सोमवारी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली. राज्यात २७ महानगरपालिकांची मुदत संपली असून जालना आणि इचलकरंजी या दोन महानगरपालिका नवीन अस्तित्वात आल्या आहेत. त्यांच्याही निवडणुका प्रथमच होणार आहेत. मात्र सर्वाधिक लक्ष हे मुंबई महानगरपालिकेकडे आहे. ईशान्येतल्या सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात राज्यांपेक्षा मुंबई महानगरपालिकेचे बजेट मोठे आहे. कोणत्याही परिस्थितीत यावेळी ही महानगरपालिका आपल्या ताब्यात आली पाहिजे यासाठी भाजपने चंग बांधला आहे.२०१७ साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकसंघ शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. त्यावेळीही या दोघांच्या जवळपास समान जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेला ८४ आणि भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. तत्कालीन भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अपक्ष आणि इतरांचा पाठिंबा घेऊन भाजपचा महापौर बसवण्याची तयारी केली होती. मात्र त्यावेळी राज्यात भाजप आणि एकसंघ शिवसेनेचे सरकार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोणतीही रिस्क घेण्याची तयारी नव्हती. मुंबईच्या महापौर पदापेक्षा त्यांना स्वतःचे मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे वाटत होते. एकदा उद्धव ठाकरेंना मुंबई दिली की आपण बिनधास्तपणे राज्य चालू शकतो या विचाराने त्यांनी आशिष शेलार यांच्या तयारीवर खो घातला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. त्यांची भाजपच्या महापौराला पाठिंबा देण्याची तयारी होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी न दिल्याने पुढे हे सर्व नगरसेवक एकसंघ शिवसेनेत सामील झाले. त्यावेळी शिवसेनेला आवरले असते तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची हिंमत झाली नसती.

मुंबई महानगरपालिका निवडणुका सुमारे चार वर्ष उशिराने होत आहेत. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे सर्व गणित बदलले आहे. एक संघ शिवसेनेत फूट पडली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने मुंबई महानगरपालिकेबाबत भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेची युती नसल्याने आता भाजपने जास्त जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे. आपली शिवसेना हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या विचाराची शिवसेना असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच करतात. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे ते स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उतरणार का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनीच महायुती म्हणून आपण निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही याला दुजोरा दिला आहे. महानगरपालिका निवडणुकांना अद्याप महिनाही उरलेला नाही. अजूनही महायुतीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. या चर्चेनंतर महा युतीतील पक्ष निवडणुकीला कसे सामोरे जाणार ?हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण भाजपने मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर , पनवेल, मीरा भाईंदर आधी महानगरपालिकांमध्ये भाजपने स्वतंत्र पणे निवडणूक लढवण्याचे तयारी सुरू केली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये अजित दादा पवार यांचे वर्चस्व आहे. तेथे महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणाही केली आहे. या महानगरपालिकांतील मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा कुणाला होतो ते पाहण्यासाठी आपल्याला १६ जानेवारी पर्यंत थांबणे अपरिहार्य आहे. या दोन्ही महानगरपालिकांमध्ये शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षांची फारशी ताकद नाही. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करून निवडणुकीनंतर एकत्र यायचे असा निर्णय झाल्यामुळे या निवडणुका मैत्रीपूर्ण होतील.

ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही महानगर पालिका तशा पाहिल्या तर एकनाथ शिंदे या व्यक्तीच्या नावावर आणि ताकदीवर निवडून येतात. २००७ च्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेस जेरीस आणले होते. एकनाथ शिंदे यांच्या हातून ही निवडणूक काढून घेण्याची मातोश्रीवर तयारी झाली होती. अखेर एका मध्यस्थ्याने मातोश्रीवर सांगितले की ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर दिल्यास ते ही महानगरपालिका . शिवसेनेच्या ताब्यात ठेवू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण जबाबदारी देण्यात आली आणि ही निवडणूक जिंकून एकनाथ शिंदे यांनी आपल्या मध्यस्थ व्यक्तीचा शब्द खरा ठरवला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात राहू नयेत असा आग्रह या भागातील भाजप कार्यकर्त्यांचा आहे. या पूर्वी युती असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची एकाधिकारशाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप सहन केली. याचा सूड या कार्यकर्त्यांना घ्यायचा आहे. परंतु ठाणे डोंबिवली उल्हासनगर या भागात शिंदे सेना आणि भाजपची युती झाली तरी हे पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी कष्ट घेणार आहेत. मतभेद मिटले असले तरी कार्यकर्त्यांचे मनभेद मिटलेले नाहीत.

– नितीन सावंत,  9820355612

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech