आता खरंच बास झालं…

0

दिनार पाठक

पहलगाममध्ये काल जे झालं, ते अचानक झालेलं नाही. तो भ्याड दहशतवादी हल्ला तर अजिबातच नाही.
झालं ते अतिशय क्रूर, थंड डोक्यानं केलेलं सामूहिक हत्याकांड होतं. काश्मीरातील दहशतवाद, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट याबाबतच्या बातम्या अनेक वर्षं भाषांतरित केल्या. जागा, बळींचा आकडा आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनांची नावं काय ती बदलत होती. हल्ल्याचं टार्गेट मात्र नेहमी तेच असायचं.
हिंदुस्थान, भारत, इंडिया…

हे कसलं युद्ध होतं, कधीच समजलं नाही. युद्ध आझाद काश्मीरसाठी होतं, तर काश्मीर खोरंच का बेचिराख केलं जात होतं? कुठला माणूस स्वतःच्याच घरावर नांगर चालवेल? रॉकेट, बॉम्बने घर जमीनदोस्त करेल? असे अनेक प्रश्न, काश्मीर प्रश्नाचे अनेक कंगोरे अस्वस्थ करत होते. आपण तिकडे जाऊन परिस्थिती बघितलेली नाही, आपल्याला तिथली नेमकी माहिती नाही… असं मनात येऊन व्यक्त होणं टाळत होतो. अर्थात तेव्हा व्यक्त होणं हे चार-चौघांपुरतंच मर्यादित होतं. कारण सोशल मीडिया नव्हता. इंटरनेटच्या क्रांतीनंतर बऱ्याच गोष्टी नव्याने समजत गेल्या. सरकारी न्यूज एजन्सींवर जी माहिती मिळते, त्यापलीकडची माहिती डिजिटल मीडियातून मिळू लागली. सोशल मीडियानं तर जणू सगळ्या मर्यादा संपवूनच टाकल्या. काश्मीरचा प्रश्न समजू लागला. त्यावर उत्तर काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता.

यथावकाश, आर्टिकल ३७० रद्द होणं, काश्मीर खोऱ्यात निवडणूक होऊन लोकशाही मार्गानं सरकार स्थापन होणं या एकेकाळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या. काश्मीर खोऱ्यातला दहशतवादाचा शाप संपला असं वाटू लागलं… पण काश्मीरला उःशाप मिळालेला नाही, हे पहलगामच्या क्रूर, राक्षसी हल्ल्यानं साऱ्या जगाला ओरडून सांगितलंय. हा हल्ला आजवरच्या हल्ल्यांपेक्षा खूपच वेगळा, हे वास्तव लक्षात घ्यायला हवं. कारण, आजवर अशा प्रकारे हल्ला झालेलाच नाही. पोलिस, लष्कराच्या गणवेशात दहशतवाद्यांनी येणं, हल्ला करणं यापूर्वीही झालंय. पण मारण्यापूर्वी प्रत्येकाला धर्म विचारून, त्याला नागवं करून तो सांगतोय ते बरोबर असल्याची खात्री पटल्यावर डोक्यात, देहावर वाटेल तिथे गोळ्या चालवून ठार मारणं…

याला दहशतवादी हल्ला कसा म्हणायचं? हा हल्ला म्हणूनच वेगळा आहे. हा हल्ला हिंदुत्वावर का, हे ज्याने-त्याने ठरवावं. माझ्यापुरतं उत्तर मी शोधलंय. हा हल्ला माझ्या देशावर, भारतावर आहे. आज जम्मू-काश्मीरीच नाही, देशभरातून अगदी डोंबिवलीतून गेलेल्या पर्यटकांचीही दहशतवाद्यांनी क्रूर हत्या केलीये. हाताची मेंदी ओली असलेल्या मुलींचं कुंकू पुसणाऱ्यांना सहानुभूती दाखवायची? त्यांची मानसिकता समजून घ्यायची???
अरे हाssssssssट

भारतावर हल्ला करणाऱ्यांना कसली सहानुभूती दाखवायची? अजिबातच गरज नाही. ज्यांना वाटते त्यांनी खुशाल दाखवावी, त्यापुढे जाऊन अशा हल्लेखोरांची भलामण करावी, त्यांना वाट चुकलेली कोकरं मानावं, कडेवर घ्यावं, मांडीवर बसवावं किंवा अगदी दत्तक घ्यावं… काय वाटेल ते करावं.
त्यांनी काय करावं, हा त्यांचा प्रश्न,
मग मी काय करावं, हा माझा प्रश्न.

अशा हल्लेखोरांचं काश्मीरींनी काय करावं, हा एक वेगळा प्रश्न आहे. शांतता निर्माण झाल्यापासून, पर्यटकांचा ओढा पुन्हा सुरू झाल्यापासून काश्मीरींचे संसार, अर्थकारणही नक्कीच रुळांवर येऊ लागलं असणार. अशा घटनांमुळे काश्मीरच्या अर्थकारणाची गाडी रुळांवरून नक्कीच घसरेल. त्यामुळे असे हल्ले करणाऱ्यांना काश्मीरी पाठिंबा देतील, असं वाटत नाही. काश्मीरचे बंधू-भगिनी योग्य निर्णय घेतीलच.

त्यांनी आणि आपणही योग्य निर्णय घेण्याची वेळ आलीये, हे मात्र नक्की!
जय हिंद!

दिनार पाठक
  ९७०२८ ८८००८

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech