– नितीन सावंत
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच महायुतीतील भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे. पुण्यातील कोंढवा प्रकरण शांत झाल्यामुळे अजितदादा संघर्षाच्या पावित्र्यात नाहीत. मात्र ठाणे जिल्ह्यातील भाजप प्रवेशावरून आता शिंदे सेना आणि भाजप यांच्यात उघड संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे सेनेचे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश चांगले संघटक भाजपने आपलेसे केल्यामुळे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. शिंदे सेनेतील कार्यकर्त्यांचे हे प्रवेश रोखण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे यांनी टोकाची भूमिका घेतली. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली. मात्र शिंदे सेनेच्या या मंत्रिमंडळ बैठक बहिष्कारामुळे त्यांना हव्या तशा बातम्या टीव्ही वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रात आल्या नाहीत. उलट अनुपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झापले ‘ अशा बातम्या प्रकाशित झाल्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे अस्वस्थ होते. मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार अशा बातम्या शिंदे सेनेला अपेक्षित होत्या परंतु मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य टीव्ही वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्याने एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी वाहिन्यांच्या प्रतिनिधीना बोलावून त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात भाजपला एकटे पाडण्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.
उल्हासनगर मध्ये पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्या स्थानिक आघाडी सोबत युती करून भाजपला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. याचा दाखला देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे सेनेला आणि त्यांच्या मंत्र्यांना झापले अशा आशयाच्या बातम्या टीव्ही वाहिन्यांनी दाखवल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांना सारवासारव करण्याचे संकट ओढवले. चमकेश मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांनी वाहिन्यांसमोर खुलासे केले. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार नव्हता तर काही मंत्री अनुपस्थित होते अशा आशयाचा हा खुलासा होता. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री अस्वस्थ यासाठी होते की आपण घेतलेल्या भूमिकेची हेडलाईन होईल परंतु ती झाली नाही. या बहिष्काराचा परिणाम न झाल्यामुळे अखेर नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे धावले. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. परंतु दिल्लीतूनही एकनाथ शिंदे यांना पूरक बातम्या आल्या नाही. अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना भेट दिली परंतु फारसे इंटरटेन केले नाही, अशा बातम्या या भेटीनंतर छापून आल्या.
मात्र अमित शहा यांच्या भेटीनंतरही भाजपचे प्रवेश कार्यक्रम थांबलेले नाहीत आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात शिंदे सेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. माझं भाजप प्रदेशाध्यक्ष हे सध्या ठाणे जिल्ह्यातच अडकले आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन महानगरपालिका भाजपने स्वतंत्रपणे लढवाव्यात असा या भागातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या दोन महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेची ताकद निर्विवाद आहे. त्यामुळेच शिंदे सेनेचे खच्चीकरण करण्यासाठी आणि भविष्यात आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पुढे सरसावले आहेत. रवींद्र चव्हाण हे स्वतः डोंबिवलीतून निवडून येत असल्याने त्यांनाही भाजपची ताकद दाखवून द्यायची आहे.
शिवसेना एकसंघ असताना एकनाथ शिंदे ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांमध्ये भाजपला फारशी भीक घालत नसत. त्यामुळे त्यांना दिलेल्या जागांवर निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नसायचा. परंतु आता ठाणे जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्याने त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. ठाण्याचे आमदार संजय केळकर हे तर पूर्वीपासून यासाठी आग्रही आहेत. ठाणे शहरात शिवसेनेला धूळ चारून ते निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनाही शिवसेनेचे अर्थात एकनाथ शिंदे यांचे पूर्वीचे उट्टे काढायचे आहे.
पुण्यातील कोंढवा जमिनीचे प्रकरण काढल्यानंतर उप मुख्यमंत्री अजित दादा पवार हे सुद्धा शांत आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये मस्ती करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी वेळेवर कोंडवा जमिनीचे प्रकरण देशभर गाजल्याने त्यांनी सध्या शांत बसण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही शांत बसण्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा झाला आहे हे गेल्या आठवड्यापासून वारंवार दिसत आहे. परंतु एकनाथ शिंदे हे फारसा संघर्ष न करता गनिमी काव्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी लढतील असा शिंदेसेनेतील कार्यकर्त्यांचा दावा आहे.
आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरात आपल्या विरोधात आलेली दोन मोठी संकटे व्यवस्थित हाताळली. मराठा आंदोलन सुरू झाले तेव्हा शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची वाट पाहत होते. परंतु हे प्रकरण त्यांनी शांतपणे निपटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांचे मुंबईतील प्राईम ठिकाणी असलेले SRA प्रकल्प आणि जुहूतील 800 कोटींचा भूखंड ही प्रकरणेही मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित हाताळली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी हे प्रकरण उपस्थित केले आणि नंतर त्या शांत झाल्या. पुढे या प्रकरणाचा पाठपुरावा कुणीही केला नाही.
नितीन सावंत, ९८९२५१४१२४