भुजबळांची उपयुक्तता की…

0

– नितीन सावंत

अखेर तथाकथित ओबीसी हृदयसम्राट छगन भुजबळ यांना मंत्रीपदाचा टिळा लागला. बीड प्रकरणात माध्यम ट्रायलवर आरोपी ठरलेले वंजारी नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा हे खाते होते. गेले अडीच वर्षे हेच हे खाते भुजबळ यांच्याकडेच होते. परंतु राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे थयथयाट केला होता. परंतु अजितदादा पवार यांनी त्यांची फारशी दखल न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु भुजबळांच्या नशिबाने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ओबीसी हृदय सम्राट छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी लागली.

२०१४ साली राज्यात भाजप प्रणित सरकार आल्यानंतर लगेचच भुजबळ यांना मनी लॉंडरिंग केस मध्ये ईडीने अटक केली होती. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाही ईडीनेच अटक केली होती. परंतु भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे बाहेर होते. त्यांनाही अटक होणार होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाचवले होते. अखेर भुजबळ समर्थकांनी फडणवीस यांचे अक्षरशः पाय धरले त्यावेळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची सुटका झाली. या सुटकेनंतर भुजबळ यांचे समर्थक आणि माजी विधान परिषद सदस्य जयंत जाधव हे अक्षरशः फडणवीस यांच्या पाया पडले होते. त्यावेळी फडणवीस यांनी मदत केली नसती तर काका पुतणे दोघेही लवकर तुरुंगा बाहेर पडू शकले नसते. आताही भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी लढ्याचा सर्वाधिक फायदा हा मुख्यमंत्री फडणवीस यांना झाला आहे. मराठा आंदोलन आक्रमक झाले की फडणवीस घाबरतात. ज्यावेळी मराठा आंदोलन आक्रमक झाले त्यावेळी फडणवीस यांनी भुजबळ यांची मदत मागितली. त्याबरोबर लगेचच लक्ष्मण हाके नावाचे नवे ओबीसी नेते भुजबळ यांनी तयार केले. मराठा आंदोलकांना शिव्या देण्याची जबाबदारी भुजबळ यांनी हाके यांच्यावर सोपवली. हाके यांनी आपले काम चोख बजावले. परंतु याचा आपल्याला काहीतरी राजकीय फायदा होईल असे हाके आता वाटत होते. परंतु ते उपेक्षित राहिले. याचे सर्व क्रेडिट भुजबळ यांनी घेतले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना भुजबळ यांनी केलेल्या मदतीची परतफेड या माध्यमातून झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख मतदार हा मराठा असल्याने त्यांनी सुरुवातीला भुजबळ यांना बाहेर ठेवले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत भुजबळ यांना बाहेर ठेवण्याचा अजित पवार यांचा मानस होता. परंतु देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अजित पवार यांना मोडता आला नाही. अजित पवार यांचा आग्रह होता की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपर्यंत भुजबळ यांना बाहेर ठेवून त्यांचा प्रचारासाठी वापर करून घ्यायचा. परंतु मंत्री करून ते चांगला प्रचार करतील असा फडणवीस यांचा मानस होता. परंतु अजित पवार यांना आता मराठा समाज दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. एकगठ्ठा मराठा मते आणि मुस्लिम मते हा सध्या अजितदादांचा टारगेट आहे. त्यामुळे भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची त्यांची इच्छा नव्हती.

धनंजय मुंडे यांच्या गच्छंतीमुळे आता मराठवाड्यातील वंजारी समाजाला कसे आपलेसे करणार? असा यक्षप्रश्न अजित दादा यांच्यापुढे आहे. त्याचबरोबर भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे मराठा समाजाचे समाधान कसे करणार? हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मराठवाड्यात मराठा विरुद्ध वंजारी आणि मराठा विरुद्ध ओबीसी समाजात मोठी दरी आहे. ही दरी मिटवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा पुरोगामी महाराष्ट्राचा जातीयवादी महाराष्ट्र होईल ही मोठी भीती आहे.

छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे महायुतीला फायदाच होईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांचे म्हणणे आहे. परंतु भुजबळ यांच्या मराठा विरोधी आक्रमक वक्तव्यांमुळे दुखावलेला मराठा समाज सोबत कसा आणता येईल यासाठी फडणवीस सोडा पण विभागीय भाजप नेतेही त्यासाठी प्रयत्न करत नाहीत. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बऱ्यापैकी बसला. परंतु मराठा समाज हा राज्यापुरता मर्यादित आहे आम्हाला देशभरातील ओबीसींना आपले करायचे आहे असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

– नितीन सावंत, ९८९२५१४१२४

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech