मुंबई : दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचं प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर बनत असून, हे यश त्यांच्या परिश्रमाला आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याला दिलेली पावती आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर यश मिळवणं ही केवळ परीक्षेतील कामगिरी नसून त्यामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असते. या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निराश होण्याचे कारण नाही. परीक्षा ही आयुष्याची अंतिम कसोटी नसते. अपयश ही यशाच्या दिशेने टाकलेली एक पायरी आहे. आत्मपरीक्षण करा, चुका शोधा आणि नव्या उत्साहाने पुढे या. यश नेहमीच तयारीची वाट पाहत असतं. तुमच्यावर विश्वास ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा असेही उपमुख्यमंत्री म्हणतात.