तब्बल २०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या विरोधातील ऑपरेशन-सिंदूरनंतर भारतातील २०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आलीत. तसेच श्रीनगरसह १८ विमानतळे तात्पुरती बंद करण्यात आली. हवाई क्षेत्रातील निर्बंधामुळे एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळांवरून सेवा रद्द केल्या आहेत.
देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. या विमानतळांमध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर यांचा समावेश आहे. इंडिगोने हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे अमृतसर आणि श्रीनगरसह विविध विमानतळांवरून १६५ हून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. सरकारच्या हवाई क्षेत्रावरील निर्बंधांवरील अधिसूचनेमुळे, १० मे च्या भारतीय वेळेनुसार सकाळी ५.२९ वाजेपर्यंत अनेक विमानतळांवरून १६५ हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे विमान कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.इंडिगोने सांगितले की, प्रभावित प्रवाशांना पुढील उपलब्ध सेवेवर त्यांच्या विमानाचे वेळापत्रक बदलण्याचा किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांचे तिकीट रद्द करण्याचा पर्याय आहे. पूर्ण पैसे परतफेड केले जातील.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळण्यासाठी डझनभर उड्डाणे रद्द केली आहेत. फ्लाइट रडार २४ कडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपर्यंत पाकिस्तानला जाणारी किंवा येणारी किमान ५२ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. भारतातील सर्वात व्यस्त दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्रीपासून किमान ३५ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बदलत्या हवाई परिस्थितीमुळे दिल्ली विमानतळावर काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे, असे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने आपल्या ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये म्हंटले आहे.