रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी २२ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले. पोलिस अधिकाऱ्यांनी आज, बुधवारी ही माहिती दिली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनीही चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान घटनास्थळी चकमक आणि शोधमोहिम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले की, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांजवळ गेल्या काही दिवसांपासून नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे आणि आम्हाला मोठे यश मिळाले आहे.
आतापर्यंत तेथे २२ हून अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ऑपरेशन चालू आहे. त्याच वेळी, कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. कारण कारेगुट्टामध्ये अजूनही ऑपरेशन सुरू आहे. सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सतत हल्ले करत आहेत. मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. हे लक्ष्य लक्षात घेऊन, सातत्याने ऑपरेशन्स राबवल्या जात आहेत.
बस्तर प्रदेशात सुरू केलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाईंपैकी एक असलेल्या या मोहिमेत जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि छत्तीसगड पोलिसांचे एसटीएफ, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) यासह विविध तुकड्यांचे सैनिक सहभागी आहेत. बिजापूर (छत्तीसगड) आणि मुलुगु आणि भद्राद्री-कोठागुडेम (तेलंगणा) दरम्यानच्या आंतरराज्य सीमेच्या दोन्ही बाजूंना सुमारे ८०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या खडकाळ भूभागात आणि घनदाट जंगलात ही कारवाई सुरू आहे. हे ठिकाण राजधानी रायपूरपासून ४५० किलोमीटर अंतरावर आहे.