रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया’ने रविवार, २२ फेब्रुवारीला बदलापुरातील आनंद लाॅन्स आणि हाॅल येथे भव्य अशा नृत्य महोत्सवाचे आयोजन केले होते.
बदलापुर : सायंकाळी ५.०० वाजता सुरू झालेला कार्यक्रम रात्री ८.३० वाजता संपला. गेलं दशकभर प्रतिवर्षी हा महोत्सव रसिकांच्या वाढत्या मागणीने आणि उत्साहाने घेतला जातो. रसिकांच्या भरगच्च सभागृहामध्ये बदलापुरातील प्रमुख अकरा नृत्यशिक्षकांनी सुमारे १५० विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय नृत्याचा अप्रतिम आविष्कार सादर केला. रोटरी क्लबने गायत्री भट, आदिती मुळे, ईशानी देसाई, सुप्रिया पाटणकर, ऋचा नातू, नेत्रा नरवणे, शीतल कपोले, कविता बोराडे, सानिका काळे, शुभांगी शिंदे आणि फाल्गुनी पवार या नृत्याशिक्षकांचा सत्कार केला. सर्व सहभागी कलाकारांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. भारतीय अभिजात शास्त्रीय नृत्याची परंपरा नवीन पिढीनेही पुढे चालू ठेवावी आणि त्यासाठी शिष्यगण आणि शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे क्लबचे अध्यक्ष अमित पाध्ये यांनी सांगीतले. नृत्य महोत्सव हा आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एक अविस्मरणीय आणि यशस्वी सांस्कृतिक सोहळा ठरला असे ही त्यांनी प्रतिपादन केले.
महाराष्ट्रातील संस्कृतीची समृद्ध परंपरा, भक्तीभाव आणि कलेची सुंदर अभिव्यक्ती या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाली असे उपस्थित रसिक आवर्जून बोलत होते. या महोत्सवात सादर झालेल्या विविध नृत्यप्रकारांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर आपल्या संस्कृतीची आध्यात्मिक बाजूही प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडली. कलाकारांनी सादर केलेल्या भावपूर्ण अभंगांवरील आणि वारी संकल्पनेवरील नृत्यांनी सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण केले. प्रत्येक सादरीकरणामागील मेहनत, साधना आणि गुरूंचे मार्गदर्शन स्पष्टपणे जाणवत होते.

या कार्यक्रमाच्या यशामागे कलाकारांची निष्ठा, आणि रोटरी सदस्यांचे मनापासून मिळालेले सहकार्य हेच खरे बळ ठरले. समाजात संस्कृती आणि कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे, आणि रोटरी नेहमीच अशा विधायक कार्यासाठी कटिबद्ध असते असेही रसिकांचे मत होते. सर्व नृत्य शिक्षकांनी सांगितले की नृत्य ही सादरीकरणाची कला आहे आणि त्यासाठी रोटरी क्लबने आम्हाला वेळोवेळी मंच उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे रसिकांचे उदंड प्रेम आणि प्रतिसाद आम्हाला लाभतो.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अमित पाध्ये व प्रथम महिला अक्षदा पाध्ये, सचिव संतोष बने खजिनदार वीणा पढेर, प्रकल्प प्रमुख प्रतिभा मोरे आणि क्लबचे सभासद यांनी घेतलेले कष्ट खूप मोलाचे होते. कार्यक्रमाच्या सफलते मुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता. रोटरी सदस्यांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेस हातभार लावला. विशेष कौतुक म्हणजे अवनी पाध्ये व राजस कवठणकर या दोन लहान मुलींनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले.
