अमरावती : उडी मारणाऱ्या कोळीच्या (स्पायडर) ‘हायब्रोसिस्टम चिखलदरेंसीस’ या नवीन प्रजातीचा शोध मेळघाटात लागला आहे. या कोळीचा शोध चिखलदरा येथे लागल्यामुळे कोळीच्या नावात चिखलदरा हा शब्द टाकण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. या संशोधनाने मेळघाटातील जैवविविधतेच्या संपत्तीला नव्याने अधोरेखित केले आहे.
हे संशोधन ‘सर्किट- द अरेक्नॉलॉजिकल बुलेटीन ऑफ द मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. हे संशोधन येथील कोळी अभ्यासक डॉ. अतुल बोडखे आणि त्यांच्या लखनौ विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनी क्रितिका राव यांनी केलेले आहे. दर्यापूर येथील जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील कोळी संशोधन प्रयोगशाळेत या महत्वपूर्ण शोधावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
‘हॅब्रोसेस्टम जंपिंग स्पायडर’ हे जमिनीवर राहणारे मांसाहारी जीव आहेत. आकर्षक देखाव्यासाठी आणि वर्तनासाठी, विशेषतः त्यांच्या अपवादात्मक दृश्य तीक्ष्णतेसाठी ते ओळखले जातात. भारतातील पश्चिम घाट आणि युरेशिया आणि आफ्रिकेच्या इतर भागांसह विविध अधिवासांमध्ये ते आढळतात, काही प्रजाती ऑस्ट्रेलिया आणि सोलोमन बेटांमध्ये आढळतात. या कोळीच्या जगामध्ये एकूण ५९ प्रजातीचा आजपर्यंत शोध लागलेला आहे त्यापैकी नऊ प्रजाती भारतात आढळतात. ते सामान्यतः विविध अधिवासांमध्ये आढळतात, ज्यामुळे ते परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्वाचे सूचक बनतात.
निसर्गाचे चक्र संतुलित ठेवण्यासाठी कोळ्यांचा मोठा उपयोग होतो. त्यांचे मुख्य खाद्य किडे, जंतू असल्यामुळे शेतातील पिकांवरील तसेच झाडावरील किडे खाऊन त्यांचे रक्षण ते करत असतात. तर कोळी स्वत: पक्षी, सरडे आणि अन्य कीटकांचे खाद्य असल्याने निसर्गाचे चक्र अबाधित ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. कोळ्यांनी तयार केलेले जाळे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे असते, असे डॉ. अतुल बोडखे यांनी सांगितले.